वाशीम,
son-in-law-murder-case : वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुयातील मेडशी येथे जावयाच्या झालेल्या खून प्रकरणात सासू, दोन मेहुणे व मेहूनी अशा चार जणांना जन्मठेपेची शिक्षा विद्यमान न्यायधीश जे. पी. झपाटे यांनी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर असे की, वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुयातील मेडशी येथे उपरोक्त आरोपीच्या मेहुणीसोबत अनैतिक सबंध असल्याचा राग मनात धरुन मुकेश चव्हाण हा घरासमोर जात असतांना त्याला घरात ओढून घराचे दार बंद करुन मारहाण केली व गळा आवळून खून केला. याबाबतची फिर्याद मृतकाची पत्नी प्रतिभा मुकेश चव्हाण हिने ७ डिसेंबर २०२२ रोजी पोस्टे मालेगाव येथे दिली. त्यावरुन विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन आरोपीविरुध्द विद्यमान न्यायालयात दोषारोप दाखल केले. दरम्यान मृतकाची पत्नी न्यायालयासमोर फितूर झाली. परंतु सरकार पक्षाच्या वतीने आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द केला.
सरकार पक्षाच्या वतीने अॅड. पुरुषोत्तम ढोबळे यांनी काम पाहीले. सहायक म्हणून अॅड. संगीता जाधव यांनी सहकार्य केले. याप्रकरणी आरोपीस मृतक मुकेश चव्हाण यांच्या खुनाबाबात दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त शिक्षा तसेच फितून र्फिर्यादी प्रतिभा चव्हाण हिच्या विरुध्द कारणे दाखवा नोटीस काढून तिच्या विरुध्द कार्यवाही करण्याकरीता आदेशीत केले. तसेच गुन्ह्यातील तपास अधिकारी पुष्पलता वाघ यांनी केलेल्या तपासामधील चुका बाबत पोलिस अधीक्षक यांच्या मार्फत कार्यवाही करण्याकरीता आदेशीत केले.