वॅगेनॉर वाहन वृक्षावर धडकले

एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, एक गंभीर

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
वरूड,
wagoner accident तालुक्यातील बेनोडा (शहीद) पोलिस स्टेशन हद्दीतील वरूड ते अमरावती महामार्गावरील खडका फाट्यावरील रस्त्यालगत असणाऱ्या महाकाय वृक्षाला मोर्शीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मारूती सुझुकी वॅगेनॉर वाहन क्रमांक एम एच ४० के आर ०७२१ ने जबर धडक दिली. या अपघातामध्ये वाहनातील नांदणे कुटुंबातील एकुण चार सदस्यांपैकी ३ लोकांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सदर घटना मंगळवार २८ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
 

वॅगेनॉर वाहन वृक्षावर धडकले
 
 
मुलगी दिया गोपाल नांदणे (३) या चिमुकलीसह, आई किरण गोपाल नांदणे (३०), आजोबा समाधान किसण नांदणे (६२) यांचा मृतांमध्ये समावेश असून वाहन चालक गोपाल समाधान नांदणे (३८) हे गंभीर जखमी झाले आहे. सर्व रा.खैरी ता. कामठी जि.नागपुर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
 
प्राप्त माहितीनुसार, नांदणे कुटुंबीय आपल्या मारूती सुझुकी वॅगेनॉर वाहनाने सकाळी खैरी येथुन वानखेड ता.सग्रामपुर जि. बुलढाणा येथे भाचीच्या विवाह सोहळ्याकरिता जावायाकडे (पारीसे कुटुंबात) कळमेश्वर, काटोल, वरूड मार्गे मोर्शीकडे जात होते. तेव्हा वरूड येथुन जवळच असलेल्या बेनोडा पोलीस स्टेशन हद्दीतील खडका फाट्यावरील रस्त्यालगत असणाऱ्या एका महाकाय वृक्षावर त्यांचे वॅगेनॉर वाहन आदळले. या भिषण अपघातानंतर रस्त्याने ये- जा करणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली व मदत कार्य सुरू केले. तसेच घटनेची माहिती बेनोडा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी दिया, किरण, समाधान या एकाच कुटुंबातील तिघांना मृत घोषित केले. गंभीर अवस्थेत असलेल्या गोपाल यांच्यावर उपचार सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. वृत्त लिहेतोवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती. पुढील तपास ठाणेदार विवेक देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस करित आहे. तिन्ही मृतकांचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.