भयानक...लातूरमध्ये उष्माघाताचे ३९ रुग्ण, ३ मृत्यू

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
पुणे,
39 heatstroke patients in Latur महाराष्ट्रात वाढलेल्या प्रचंड उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने १ मार्च ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत सादर केलेल्या अहवालानुसार, उष्णतेच्या झटक्याची ३९ प्रकरणे नोंदली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर काही मृत्यूंचीही नोंद झाली असून, वाढत्या तापमानामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. या कालावधीत राज्यभरातील रुग्णालयांमध्ये तीन लाखांहून अधिक नागरिकांनी विविध आजारांसाठी उपचार घेतले आहेत. गेल्या काही दिवसांत उष्णतेच्या झटक्याच्या नव्या घटना समोर आल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. त्याचबरोबर हृदयविकाराच्या झटक्यांमुळेही मृत्यूंची संख्या वाढल्याचे चित्र आहे, ज्यामुळे एकूण मृतांचा आकडा शंभरच्या पुढे गेला आहे.
 
latur
 
 
लातूर जिल्ह्यात उष्णतेचा सर्वाधिक फटका बसला असून, येथे उष्णतेच्या झटक्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शेतातून घरी परतल्यानंतर कडक उन्हामुळे एका तरुणाला चक्कर येऊन तो कोसळल्याची घटना औसा तालुक्यातील एरंडी येथे घडली. उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी एका लहान बालकाचाही मृत्यू झाला होता, तर निलंगा तालुक्यातील एका शेतकऱ्यानेही उष्णतेमुळे प्राण गमावले. दरम्यान, हवामान खात्याने येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे आणि शरीराला थंड ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. प्रशासनही या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, नागरिकांनी सतर्क राहून स्वतःचे आरोग्य जपावे, असे आवाहन करण्यात येत आहे.