अनिल अंबानीवर ईडीचा ‘आर्थिक सर्जिकल स्ट्राईक’

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली
Anil Ambani देशातील आर्थिक तपास यंत्रणा असलेल्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाशी संबंधित कंपन्यांवर मोठी कारवाई करत तब्बल 19,344 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. बँक फसवणूक आणि मनी लाँडरिंग प्रकरणांच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे उद्योगजगतामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
 
 
Anil Ambani
ईडीकडून सुरू असलेल्या तपासानुसार रिलायन्स समूहातील विविध कंपन्यांनी 2010 ते 2019 या कालावधीत देश-विदेशातील बँकांकडून मोठ्या प्रमाणावर कर्जे घेतली होती. या कर्ज व्यवहारांमध्ये नियमांचे उल्लंघन, निधीचे चुकीचे वळवणे तसेच संबंधित कंपन्यांमधील व्यवहारांद्वारे कर्जांची पुनर्रचना केल्याचे गंभीर आरोप तपास यंत्रणेने नोंदवले आहेत. एकूण थकबाकी सुमारे 40 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचेही तपासात समोर आले आहे.या प्रकरणात रिलायन्स कम्युनिकेशन्स, रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स यांसारख्या कंपन्यांचा समावेश असून, अनेक बँकांनी या खात्यांना ‘फ्रॉड’ घोषित केल्याचेही अधिकृत तपासात स्पष्ट झाले आहे. ईडीने या कारवाईअंतर्गत विविध शहरांतील स्थावर मालमत्ता, बँक ठेवी, शेअरहोल्डिंग आणि व्यावसायिक संपत्ती जप्त केली आहे.
 
तपास यंत्रणेनुसार,Anil Ambani  काही कर्जांची रक्कम संबंधित कंपन्यांमधूनच फिरवून इतर ठिकाणी वळवण्यात आली, तसेच बनावट व्यवहारांच्या माध्यमातून निधीचा गैरवापर झाल्याचे संकेत मिळाले आहेत. या घडामोडींमुळे आर्थिक गैरव्यवहार आणि कर्ज फसवणुकीच्या स्वरूपावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दरम्यान, ईडीकडून सुरू असलेला हा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. अधिक मालमत्ता आणि व्यवहारांची चौकशी सुरू असून, भविष्यात आणखी काही मोठ्या कारवाया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे कॉर्पोरेट क्षेत्रात आणि बँकिंग व्यवस्थेत मोठी चर्चा सुरू झाली आहे.