‘जनतेचा भिडू’ बच्चू कडूंचा स्पष्ट नकार

विलिनीकरणाच्या वाऱ्यांवर "ब्रेक".

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
मुंबई
Bachchu Kadu प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शिवसेना (शिंदे गट) सोबतच्या संभाव्य राजकीय समीकरणांबाबत आणि प्रहार संघटनेचे शिवसेनेत विलिनीकरण होण्याच्या चर्चांना स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे . मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या सर्व चर्चा निरर्थक असल्याचे सांगत अद्याप अशा कोणत्याही विषयावर औपचारिक चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.
 
 

Bachchu Kadu  
बच्चू कडू यांनी सांगितले की, मंत्री उदय सामंत यांच्याशी काही मुद्द्यांवर संवाद झाला असला तरी त्याचा अर्थ राजकीय निर्णयांशी जोडणे चुकीचे ठरेल. “चर्चाच नाही, तर त्यावर बोलण्याचा प्रश्नच येत नाही,” असे ते म्हणाले. प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या विधान परिषदेवरील संभाव्य प्रवेश आणि पक्षविलिनीकरणाच्या चर्चांना त्यांनी “बातमीतून तयार झालेल्या बातम्या” असे संबोधले.
दरम्यान, अचलपूर Bachchu Kadu विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीतील पराभवाबाबत बोलताना बच्चू कडू भावनिक झालेले दिसून आले. या निवडणुकीत भाजपचे प्रवीण तायडे विजयी झाले होते, तर काँग्रेसचे अनिरुद्ध देशमुख यांचाही या तिरंगी लढतीत सहभाग होता. पराभवाची सल अद्याप कायम असल्याचे संकेत देत कडू यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा उल्लेख केला. त्यांनी आपण शेकडो आंदोलनांमध्ये सहभागी झालो, अनेक केसेस अंगावर घेतल्या, तसेच मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले तरीही जनतेचा कौल मिळू न शकल्याची खंत व्यक्त केली.राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी जात, धर्म आणि सामाजिक समीकरणांवर आधारित राजकारणावर टीका केली. त्यांच्या मते, अनेकदा मुद्दे आणि कार्य करणारे कार्यकर्ते मागे पडतात, तर समाज घटकांवर आधारित राजकारणाला प्राधान्य मिळते. “जनता अनेकदा जात-धर्माच्या प्रभावाखाली निर्णय घेते, त्यामुळे कार्य करणाऱ्या लोकांना मागे राहावे लागते,” असे ते म्हणाले.
 
 
विधान परिषदेवर जाण्याच्या चर्चांबाबतही त्यांनी कोणताही वैयक्तिक स्वार्थ नसल्याचे स्पष्ट केले. पद किंवा आमदारकीसाठी कोणताही राजकीय निर्णय घेणार नसल्याचे सांगत त्यांनी प्रहार जनशक्ती पक्ष जनतेसाठी कार्यरत राहील, असेही अधोरेखित केले.या पत्रकार परिषदेतून बच्चू कडू यांनी एकीकडे राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे अचलपूरमधील पराभवाची सल आणि राज्यातील राजकारणाबद्दलची त्यांची नाराजी स्पष्टपणे व्यक्त झाल्याचे दिसून आले.