मुंबई
ashu reddy ‘बिग बॉस तेलुगू’मधून प्रसिद्ध झालेली आशू रेड्डी हिच्याविरोधात फसवणुकीचा गंभीर आरोप समोर आला आहे. हैदराबादमध्ये एका एनआरआय सॉफ्टवेअर इंजिनिअरची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार सेंट्रल क्राईम स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे. लग्नाचे आश्वासन देत अभिनेत्रीने त्या तरुणाकडून तब्बल 9.35 कोटी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून, अभिनेत्रीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
तक्रारीनुसार, 2018 साली त्या एनआरआय तरुणाची आणि अभिनेत्रीची ओळख झाली होती. हळूहळू त्यांच्यात जवळीक वाढली आणि दोघेही रिलेशनशिपमध्ये आले. अभिनेत्रीने लग्न करण्याचे वचन दिल्यामुळे त्या तरुणाने तिच्यावर विश्वास ठेवत मोठ्या प्रमाणात पैसे आणि महागड्या वस्तू दिल्या. त्यात आलिशान गाड्या, फ्लॅट्स आणि जवळपास 5 किलो सोन्याचा समावेश असल्याचं सांगितले जात आहे. मात्र, नंतर अभिनेत्रीने लग्नाबाबत माघार घेतल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे, ज्यामुळे हा वाद आणखी वाढला.
याच तक्रारीत अभिनेत्रीच्या ashu reddy बहिणीचाही उल्लेख करण्यात आला आहे. तिनेही त्या तरुणाकडून सुमारे 50 लाख रुपये घेतल्याचे सांगितले जात असून, ही रक्कम परत करण्यात आलेली नाही, असा आरोप आहे. दरम्यान, अभिनेत्रीने या सर्व आरोपांना नकार देत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे आणि खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून तपास सुरू आहे. या प्रकरणात आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक संबंध यामुळे गुंतागुंत वाढली असून, पुढे काय निष्कर्ष निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.