बिर्याणी-कलिंगड खाल्ल्याने कुटुंबाचा दुर्दैवी अंत; शरीरात आढळला धक्कादायक पदार्थ

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
मुंबई,
biryani-kalingad-case : मुंबईतील पायधुनी परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. डोकाडिया कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणात आता नवीन आणि गंभीर खुलासा झाला आहे.
 
 
MUMBAI
 
 
 
प्राथमिक तपासात समोर आले आहे की, मृतांच्या शरीरात वेदनाशामक स्वरूपाचा संशयित पदार्थ आढळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवालानंतरच यामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबाने रात्री उशिरा बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड (टरबूज) खाल्ले होते. काही वेळातच त्यांना उलट्या, चक्कर आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला.
 
या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला आहे. घरातून अन्नाचे नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यामध्ये बिर्याणी, कलिंगड, पाणी, मसाले आणि इतर खाद्यपदार्थांचा समावेश आहे.
 
तसेच पोलिसांनी मृतांचे मोबाईल फोनही जप्त केले असून, त्यांच्या संपर्कांचा आणि व्यवहारांचा सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक निष्कर्षानुसार अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र कोणतेही ठोस कारण अद्याप निश्चित झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अन्नसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.