तभा वृत्तसेवा
वणी,
blackmail-torture-allegations : समाज माध्यमावरील ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्यानंतर एका विवाहित महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, 36 वर्षीय पीडिता नोकरदार असून तिची ओळख यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील तुषार गजानन काकडे (वय 30) याच्याशी सोशल मिडियावरील मेसेंजर आणि इन्स्टाग्रामद्वारे झाली होती. सुरवातीला दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली आणि नंतर त्याचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले.
दरम्यान, आरोपीने पीडितेला लग्नासाठी दबाव टाकला. मात्र ती विवाहित असून दोन मुलांची आई असल्याने तिने नकार दिला. यानंतर आरोपीने तिच्यासोबत घेतलेले खाजगी फोटो व व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दबाव आणला.
तक्रारीनुसार, आरोपीने 15 ऑक्टोबर 2024 ते 26 एप्रिल 2026 दरम्यान विविध ठिकाणी नेऊन धमकीच्या आधारे वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तसेच तो पीडितेच्या कामाच्या ठिकाणीही जाऊन तिला त्रास देत होता.
घडलेल्या प्रकाराची माहिती पीडितेने आपल्या पतीला दिल्यानंतर तिने वणी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सोशल मीडियावरील ओळखींच्या वाढत्या गैरवापरावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लागले आहे.