वर्धा नदीत बुडालेल्या तिघांचे मृतदेह सापडले

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
घुग्घूस, 
wardha-river : जिल्ह्यातील धानोरा गावाजवळील वर्धा नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली. परंतु, रात्र झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली होती. दरम्यान, बुधवार, 29 एप्रिल रोजी सकाळी पुन्हा शोधमोहिम सुरू केली असता, तिघांचेही मृतदेह सापडले.
 
 
jkl
 
 
 
चंद्रपूर तालुक्यातील धानोरा गाव गावालगतच्या वर्धा नदीवर राजू कोडापे (40) हे आपली मुलगी अर्पिता कोडापे (12) आणि भाची प्रियांका मडावी (14) यांच्यासह मंगळवारी कपडे धुण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने राजू कोडापे हे खोल पाण्यात जाऊन बुडू लागले. वडील बुडत असल्याचे पाहून मुलगी अर्पिता त्यांना वाचवण्यासाठी नदीत धावली. मात्र, तिलाही पाण्याचा अंदाज न आल्याने तीही बुडू लागली. यानंतर भाची प्रियांका मडावी हिने नदीत उडी घेतली. परंतु, दुर्दैवाने तिलाही बाहेर पडता आले नाही आणि तिघेही पाण्यात बुडाले.
 
 
घटनेची माहिती कळताच घुग्घुस पोलिस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र, अंधार वाढत गेल्यामुळे आणि नदीतील परिस्थिती धोकादायक असल्याने रात्री उशिरा शोधकार्य थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी सकाळी पुन्हा शोधमोहिम सुरू केली असता तिघांचेही मृतदेह हाती लागले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठविले.