दौंड,
Chakankar's brothers defeated राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती येत असताना अनेक ठिकाणी अनपेक्षित घडामोडी समोर येत आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील नांदूर ग्रामपंचायतीत झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत माजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे भाऊ संतोष बोराटे यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निकालामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून, चाकणकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या चुरशीच्या लढतीत प्रतिस्पर्धी उमेदवार विशाल नरेंद्र थोरात यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत सरपंचपद पटकावले. तब्बल तीनशेहून अधिक मतांनी मिळालेल्या या विजयामुळे थोरात यांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली. नांदूरमधील या निकालानंतर गावात आणि परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
संतोष बोराटे यांच्या पराभवामागे स्थानिक पातळीवरील नाराजी हे प्रमुख कारण असल्याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल मतदारांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. मात्र या पराभवानंतर बोराटे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, राज्यातील इतर ठिकाणांच्याही निकालांनी लक्ष वेधले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे सरपंचपदाच्या निवडणुकीत दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनाही पराभव पत्करावा लागला. तर यवतमाळ जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर होताच नव्याने निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांनी जल्लोष साजरा केला. या सर्व निकालांमुळे राज्यातील स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.