तभा वृत्तसेवा
उमरखेड,
control-of-stray-dogs : शहरात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला असून अनेकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उमरखेड नगर परिषदेच्या दुर्लक्षित धोरणामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
याविषयी नप गटनेते व नगरसेवकांसह जलील कुरेशी मित्रमंडळ व राकाँ पदाधिकाèयांनी मंगळवार, 28 एप्रिल रोजी नप मुख्याधिकाèयांना निवेदन देत, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा नगर पालिकेत सोडण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे काही कुत्रे पिसाळलेले असल्याची माहिती समोर येत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी एका दिवसात तब्बल 30 ते 35 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली होती.
त्यानंतरही परिस्थितीत कोणताही सुधार दिसून आलेला नाही. मंगळवारीही एका सेवानिवृत्त अधिकाèयाला कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शहरातील रस्त्यांवर सकाळ-संध्याकाळ फिरायला जाणारे नागरिक, खेळणारी लहान मुले, वृद्ध महिला-पुरुष, तसेच कामानिमित्त ये-जा करणारे लोक, यांना मोकाट कुत्र्यांमुळे सतत धोका निर्माण झाला आहे. अनेक भागांमध्ये कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसत असून ते अचानक हल्ला करतात, अशी तक्रार आहे.
या गंभीर समस्येबाबत अनेक वेळा नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांना निवेदन देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. दरम्यान, या समस्येचा तत्काळ बंदोबस्त करावा, अन्यथा मोकाट कुत्र्यांना थेट नगर परिषदेच्या आवारात आणून सोडण्याचे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा गटनेते विजय हरडपकर, नगरसेवक सुरेंद्र कोडगिरवार, नगरसेवक विजय गुजरे, नगरसेवक गोपाळ कलाने, नगरसेवक अमोल तिवरंगकर तसेच जलील करेशी मित्र मंडळाचे अकिल कुरेशी, अहेमद पटेल, अस्लम शेख, राकाँचे शाहरुख पठाण व सामाजिक कार्यकर्ते बबलू मैड, अतुल मादावार, गौरव कस्तुरे यांनी दिला आहे.