तभा वृत्तसेवा
दारव्हा,
radhe-pushpa-gas-agency : तालुक्यातील बोरी खुर्द येथील राधेपुष्प गॅस एजन्सीचे मयूर ज्ञानेश्वर टेकाम व कैलास राधेश्याम जयस्वाल यांच्यावर जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
मनमानी करत असल्याच्या तक्रारींमुळे राधेपुष्प गॅस एजन्सीची सखोल तपासणी करण्यात आली. यात, लाभार्थ्यांनी 5 सिलेंडर प्रत्यक्षात उचल केल्याचे निदर्शनास आले. परंतु ऑनलाईन अॅप व मोबाईल नंबरद्वारे पडताळणी केली असता 13 सिलेंडर्सची उचल झाल्याचे दिसले. 8 अतिरिक्त गॅस सिलेंडरची उचल नियमबाह्य रितीने झाल्याचे स्पष्ट झाले.
या अनुषंगाने राधेपुष्प गॅस एजन्सीचा मालक मयूर टेकाम व भागीदार कैलास जयस्वाल यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासणीत आढळून आलेल्या घरगुती 26 पैकी 6 सिलेेंडर सदोष दिसून आले. उर्वरित 20 सिलेंडरबाबत त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही.
या एजन्सीत रिकामे 167 सिलेंडर कमी आणि 20 भरलेले अतिरिक्त आढळले. त्यांनी नियम व आदेशांचा भंग केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या दोघांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई निरीक्षण अधिकारी बांते, पुरवठा निरीक्षक तुषार राठोड, लिपिक रूपाली मडावी यांनी पार पडली. पुढील कारवाई लाडखेड पोलिस करीत आहेत.
तक्रार करा : आवाहन
कुठलीही एजन्सी नाहक त्रास देत असेल किंवा जास्त दर आकारत असेल तर त्याविरुद्ध पुरवठा विभागात तक्रार नोंदवावी. शासनाच्या प्रचलित नियमांनुसार कारवाई करण्यात येईल.
राजेश पऊळ
तहसीलदार, दारव्हा