मुंबईत भाषा सक्तीचा नवा अध्याय! रिक्षाचालकांसाठी डेडलाईन ठरली

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
मुंबई,
deadline-set-for-marathi-language : मुंबईत परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेच्या वापराबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आता स्पष्ट केले आहे की, १६ ऑगस्टनंतर ज्या चालकांना मराठी येत नाही त्यांच्यावर थेट कारवाई केली जाणार आहे.
 
 
RIKSHAW
 
 
या निर्णयानुसार १ मे ते १५ ऑगस्ट हा कालावधी चालकांसाठी शिकण्याचा आणि तयारीचा वेळ म्हणून देण्यात आला आहे. या काळात कोणताही दंड किंवा कारवाई केली जाणार नाही. मात्र, या कालावधीत चालकांनी मराठी शिकणे आवश्यक आहे, अन्यथा पुढे अडचण निर्माण होऊ शकते.
 
सरकारने यासाठी विशेष ‘मराठी मार्गदर्शन पुस्तिका’ देखील तयार केली आहे, जी चालकांना मराठी शिकण्यासाठी मदत करेल. ही पुस्तिका मोबाईलवरही उपलब्ध असेल आणि त्यात ऑडिओच्या माध्यमातूनही मराठी शिकण्याची सोय असेल.
 
परिवहन विभागाने सांगितले की, या काळात आरटीओ फक्त कागदपत्रांची तपासणी करेल, भाषेबाबत कोणतीही कारवाई होणार नाही. पण १६ ऑगस्टनंतर तपासणी दरम्यान जर चालकांना मराठीचे प्राथमिक ज्ञान नसल्याचे आढळले, तर कठोर कारवाई केली जाईल.
 
दरम्यान, सरकारने प्रवाशांनाही आवाहन केले आहे की त्यांनी चालकांशी मराठीत संवाद साधावा, जेणेकरून भाषेचा वापर वाढेल आणि सर्वांमध्ये समन्वय निर्माण होईल.