तभा वृत्तसेवा
ढाणकी,
donkey-dies : शहरात मंगळवार, 28 एप्रिल रोजी एक गंभीर आणि अमानवीय घटना घडली. येथील कोंडवाड्यात एका गाढवाचा मृत्यू झाला आहे. या गाढवाला गेल्या 4 दिवसांपासून पुरेसा चारा आणि पाणी देण्यात आले नव्हते. म्हणूनच त्याचा मृत्यू झाला असे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.
प्राण्यांची देखभाल करण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाèयांच्या आणि व्यवस्थापनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या मुक्या प्राण्याचा तडफडून मृत्यू झाला. हे कृत्य प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेचे उल्लंघन आहे.
सरकारी, सार्वजनिक कोंडवाड्यात प्राण्यांना अशा प्रकारे वागवणे हा कायदेशीर गुन्हा आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोषींवर कडक कारवाई व्हावी, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.
विशेष म्हणजे ढाणकी नगर पंचायत प्रशासनाने दोन गाढव कोंडवाड्यात टाकले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला व एक अर्धमेल्या अवस्थेत होते. या परिस्थितीतही जिवंत असलेल्या गाढवाचा दंड नपं प्रशासनाने त्या गाढवाच्या मालकाकडून वसूल केला. पण जे गाढव मृत पावले त्याची जबाबदारी कोण घेणार ?
ज्यावेळी एक गाढव गतप्राण झाले होते व एक अत्यवस्थ होते. जे गाढव मरण पावले त्याचे शवविच्छेदन करणे आवश्यक असताना, नपंचा कोणताही कर्मचारी व अधिकारी तेथे फिरकलाही नाही. मृत गाढवाचे शवविच्छेदन करण्याची माणुसकीसुद्धा भावनाशून्य ढाणकी नगर पंचायत प्रशासनाने दाखवली नाही.