अग्रलेख. . .
nature is dangerous निसर्गावर सतत चालून जाणाऱ्या माणसाच्या अंगावर कधीतरी निसर्ग येणारच ना...! तो येतोय; आलाय. पृथ्वीचे नैसर्गिक कवच कमकुवत करून कथित विकासाच्या मार्गावर बेधुंद धावणाऱ्या पावलांना तीव्र होत चाललेल्या उष्णतेच्या लाटा कधीतरी अडवणारच. त्या तशा अडवीत आहेत. निसर्गाशी संघर्ष करून काँक्रीटची जंगले उभारणाऱ्या माणसाला सावलीसाठी शेवटी पुन्हा झाडांच्याच छायेत यावं लागणार. कारण माणसांच्या जगण्याचा मूळ आधार त्याच्या सभोवतालचा निसर्गच आहे. निसर्गाशी वैर करून विकासाचे नवे मार्ग शोधता येत नसतात; उलट असा विकास शेवटी विनाशाचाच मार्ग ठरतो, हे सिद्ध झाले आहे. हवा, पाणी, अन्न, ऋतूंचा समतोल आणि आरोग्य या मानवी जीवनाच्या सर्व मूलभूत गरजा निसर्गावरच अवलंबून आहेत. मात्र, विकासाच्या नावाखाली माणसाने निसर्गाचा समतोल बिघडविला आहे. अतिरेकी वृक्षतोड, वाढते प्रदूषण, बेफाम शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या अनियंत्रित वापरामुळे पर्यावरणाची घडी विस्कटली आहे. त्याचे सर्वाधिक तीव्र परिणाम आज वाढत्या तापमानाच्या रूपाने आपल्याला भोगावे लागत आहेत.
सध्याच्या तापमानामुळे आपण पृथ्वीवर आहोत की एखाद्या अग्निग्रहावर, असा प्रश्न पडण्यासारखे वातावरण आहे. एप्रिल महिन्यातच मे महिन्याहून अधिक तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत आहेत, विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत, उष्माघाताचे रुग्ण दररोज वाढत आहेत. बेवारस लोक तर जिवाला मुकत आहेत. आपल्याला पृथ्वीच्या संपूर्ण संहाराच्या दिशेने जायचे नसेल तर निसर्गाशी चाललेला संघर्ष तत्काळ थांबवावाच लागेल. निसर्ग आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट देतो; पण आपण त्याच्या अस्तित्वावरच घाव घालत आहोत. त्यामुळे वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड, मिथेन आणि इतर वायूंचे प्रमाण सतत वाढत चालले आहे. ‘ग्लोबल वॉर्मिंग’ ही आता केवळ शास्त्रीय संकल्पना राहिलेली नाही; ती प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्यात उतरलेले वास्तव आहे. तापमानातील वाढ ही फक्त उन्हाच्या झळांपुरती मर्यादित नाही; तापमानवाढीचा परिणाम शेती, अर्थव्यवस्था, आरोग्य आणि सामाजिक स्थैर्यावरही खोलवर होत असतो. शेतकèयांसाठी तापमानवाढ म्हणजे थेट संकटाचे दार असते. तापमानवाढीमुळे पिकांना योग्य वेळी पाऊस मिळत नाही, जमिनीतील ओलावा कमी होतो, विहिरी आटतात आणि उत्पादन खर्चही वाढत जातो. शेती हा ग्रामीण जीवनाचा कणा आहे; तोच डगमगला तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडते. शेतकऱ्यांच्या संकटाचा परिणाम थेट बाजारपेठेवर, महागाईवर आणि सर्वसामान्यांच्या जगण्यावर होतो. सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. उष्माघात, निर्जलीकरण, त्वचारोग, रक्तदाबातील चढउतार, हृदयविकार आणि श्वसनाचे आजार झपाट्याने वाढत आहेत. लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला आणि दिवसभर उन्हात काम करणारे कामगार यांना सर्वाधिक धोका असतो. रस्त्यावर काम करणारे मजूर, पोलिस, वाहतूक कर्मचारी, बांधकाम मजूर आणि शेतकरी हे दररोज जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडत असतात. त्यांच्यासाठी हे वाढणारे तापमान जीवघेणे ठरत आहे.
काँक्रीटच्या उंच इमारतींपेक्षा हिरवी झाडे, वेगवान रस्त्यांपेक्षा जिवंत नद्या आणि तात्पुरत्या सुविधांपेक्षा शाश्वत पर्यावरण अधिक महत्त्वाचे आहे. निसर्गाशी समतोल साधणे ही आता अपरिहार्यता बनली आहे. कारण निसर्ग वाचला तरच माणूस वाचेल. पाणीटंचाई ही वाढत्या तापमानाची आणखी एक गंभीर बाजू आहे. उन्हाळा वाढला की पाण्याची गरज वाढते; दुसरीकडे जलस्रोत मात्र दिवसेंदिवस आटत जातात. तलाव कोरडे पडतात, विहिरींचा तळ दिसतो, नद्यांचा प्रवाह कमी होतो आणि भूजल पातळी झपाट्याने खाली जाते. अनेक गावांमध्ये टँकरच्या भरवशावर जगावे लागते. पाण्यासाठी वाद होतात, संघर्ष वाढतात आणि काही ठिकाणी स्थलांतराची वेळही येते. भविष्यातील युद्धे पाण्यासाठी होतील, हा इशारा लवकरच खरा ठरेल असे वाटू लागले आहे. या बदलामुळे मानवी जीवनातील मानसिक ताण मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. सततची उष्णता, पाण्याची चिंता, शेतीतील नुकसान, आरोग्याचे वाढते प्रश्न आणि महागाईच्या ताणामुळे अस्थिरता आणखी गडद होत चालली आहे. पर्यावरणाचा प्रश्न केवळ निसर्गप्रेमाचा विषय राहिलेला नाही; तो थेट सामाजिक न्याय, आर्थिक समता आणि माणसाच्या जीवनाच्या गुणवत्तेशी जोडला गेला आहे.
या पृष्ठभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो; तो असा की विकासाच्या नावाखाली आपण नेमके काय गमावत आहोत? उंच इमारती, रुंद रस्ते, नवे उद्योग आणि वेगाने वाढणारे शहरीकरण ही विकासाची चिन्हे नक्कीच असू शकतात; पण जर त्यासाठी झाडे कापली जात असतील, नद्या मरत असतील, डोंगर नाहीसे होत असतील आणि तापमान असह्य होत असेल, तर अशा विकासाला टिकाऊ किंवा शाश्वत कसे म्हणायचे? पर्यावरणाचा नाश करून उभा राहिलेला विकास शेवटी मानवी अस्तित्वालाच धोका निर्माण करणार आहे. यावर उपाय नाहीत असे नाही; पण त्यासाठी तातडीची आणि सामूहिक कृती आवश्यक आहे. वृक्षलागवड आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे वृक्षसंवर्धन, पावसाच्या पाण्याचे संधारण, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, पर्यावरणपूरक शहर नियोजन, सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर, प्रदूषणावर नियंत्रण आणि शाश्वत विकासाच्या धोरणांना प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. उष्णतेच्या वाढत्या लाटांचा सामना करण्यासाठी शासनानेही स्वतंत्र आणि प्रभावी कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे. नागरिकांनीही आपल्या जीवनशैलीत बदल करणे तितकेच गरजेचे आहे.nature is dangerous पाणी वाचवणे, प्लॅस्टिकचा वापर कमी करणे, झाडे लावणे, ऊर्जा बचत करणे आणि पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे ही केवळ वैयक्तिक जबाबदारी नाही; ती सामाजिक बांधिलकी आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळणे म्हणजे केवळ निसर्गाचे नुकसान नाही, तर ती माणसासाठी धोक्याची घंटा आहे. आज आपण सावध झालो नाही, तर उद्या उष्णतेच्या या लाटा आपल्याला जगणे कठीण करतीलच. निसर्गाशी संघर्ष करून नव्हे, तर त्याच्याशी समतोल साधून मानवी जीवन सुरक्षित, समृद्ध आणि शाश्वत राहू शकते.
आज राज्यातील तापमानाची स्थिती पाहिली तर हा इशारा किती गंभीर आहे, याची जाणीव अधिक तीव्रतेने होते. विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा यांसारख्या शहरांनी 46 अंशांच्या पुढे झेप घेत राजस्थानलाही मागे टाकले आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि इतर शहरांमध्येही एप्रिल महिन्यातच मेच्या झळा जाणवत आहेत. हे वाढलेले तापमान म्हणजे निसर्गाचा संयम संपत चालल्याच्या स्पष्ट खुणा आहेत. निसर्ग आपल्याला थांबून विचार करण्यास भाग पाडत आहे की, विकासाच्या या शर्यतीत आपण जगण्याचाच पाया तर उखडून टाकत नाही ना? प्रश्न फक्त वाढत्या तापमानाचा नाही, तर पुढील पिढ्यांसाठी आपण कसे जग सोडून जाणार आहोत, याचाही आहे. विकास आणि पर्यावरण यांच्यात संघर्ष नसून समतोल असला पाहिजे. निसर्गाला विसरून माणूस विकासाची लढाई कधीच जिंकू शकत नाही; कारण शेवटी त्याचे अस्तित्वही त्याच निसर्गावर उभे आहे. म्हणूनच आता निर्णयाचा क्षण आला आहे. काँक्रीटच्या तात्पुरत्या सुखासाठी भविष्य धोक्यात घालायचे की शाश्वत पर्यावरणासाठी आजच जबाबदारी स्वीकारायची. कारण निसर्गाचा राग सहन करण्याइतकी ताकद माणसाकडे नाही; पण निसर्गाशी मैत्री करून जगण्याइतकी शहाणपणाची संधी अजूनही आपल्या हातात आहे.