वॉशिंग्टन,
Excitement in America over Iran war अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन प्रशासनामध्येच मतभेद उफाळून येत असल्याचे चित्र समोर आले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना युद्धाच्या स्थितीबाबत अचूक माहिती दिली जात आहे का, याबाबतच शंका उपस्थित केली जात आहे. एका अहवालानुसार, उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनी बंद बैठकींमध्ये याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संरक्षण विभागाचे प्रमुख पीट हेगसेथ तसेच लष्करातील वरिष्ठ अधिकारी जनरल डॅन केन यांनी या संघर्षात अमेरिकन लष्कराने मोठे यश मिळविल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, इराणच्या हवाई व नौदल क्षमतांना मोठा धक्का देण्यात आला असून संरक्षण यंत्रणाही मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त करण्यात आली आहे. तसेच अमेरिकेकडे अजूनही पुरेसा शस्त्रसाठा उपलब्ध असल्याचे ते सांगत आहेत.

मात्र, या दाव्यांबाबत उपराष्ट्रपती व्हान्स समाधानी नसल्याचे सांगितले जात आहे. त्यांना वाटते की, प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असू शकते आणि राष्ट्राध्यक्षांसमोर सादर केले जात असलेले चित्र वास्तवाशी पूर्णपणे जुळत नाही. विशेषतः क्षेपणास्त्र साठ्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली असून, सततच्या वापरामुळे भविष्यातील संभाव्य संघर्षांसाठी अमेरिकेकडे पुरेशी क्षमता उरणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.अहवालानुसार, व्हान्स यांनी सुरुवातीपासूनच या लष्करी मोहिमेबाबत आक्षेप घेतला होता आणि ती दीर्घकालीन दृष्टीने नुकसानकारक ठरू शकते, असा इशारा दिला होता. त्यांनी यापूर्वी पाकिस्तानमध्ये झालेल्या शांतता चर्चेचे नेतृत्व केले होते, मात्र त्या प्रयत्नांना यश आले नाही. पुढील चर्चेची शक्यता देखील अनिश्चित झाली आहे.
सार्वजनिकरीत्या संरक्षण प्रमुखांचे कौतुक केले जात असले तरी, बंद दाराआड मात्र रणनीतीबाबत वेगळीच चर्चा सुरू असल्याचे समोर आले आहे. काही अधिकाऱ्यांच्या मते, राष्ट्राध्यक्षांना जे ऐकायचे आहे, तेच सांगितले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व घडामोडींमुळे अमेरिकेच्या धोरणांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील काळात या मतभेदांचा परिणाम आंतरराष्ट्रीय राजकारणावरही होऊ शकतो.