पाकिस्तानात स्वयंपाकासाठी फुग्यात गॅस!

इंधन तुटवडा;टंचाईमुळे नागरिक हैराण

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
कराची,
Gas in a balloon in Pakistan पाकिस्तानातील वाढत्या महागाईसोबतच इंधनाच्या टंचाईने नागरिकांचे जगणे अधिकच कठीण झाले आहे. विशेषतः कराची शहरात गॅसचा अनियमित पुरवठा मोठी डोकेदुखी ठरत असून, लोकांना रोजच्या स्वयंपाकासाठीही संघर्ष करावा लागत आहे. या बिकट परिस्थितीत काही भागांतील रहिवाशांनी अत्यंत अनोखा आणि धोकादायक मार्ग स्वीकारला आहे. कराचीतील ओरंगी टाऊन परिसरात लोक प्लास्टिकच्या मोठ्या फुग्यांमध्ये गॅस साठवून ठेवत असल्याचे समोर आले आहे. गॅस पुरवठा वेळेवर होत नसल्यामुळे पर्याय नसल्याचे सांगत नागरिक हे फुगे वापरत आहेत. स्थानिक बाजारात उपलब्ध असलेले हे विशेष फुगे गॅसने भरून नंतर घरात नेले जातात आणि दिवसभर स्वयंपाकासाठी त्याचा उपयोग केला जातो. एका फुग्याची किंमत साधारण एक ते दीड हजार रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते.

lpg in balloon in pakistan
 
 
 
मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देण्यासारखे
गॅसच्या टंचाईमुळे अनेक कुटुंबांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. साधे जेवण बनवणेही कठीण झाले असून, त्यामुळे लोकांना अशा धोकादायक उपायांचा अवलंब करावा लागत आहे. मात्र, तज्ज्ञांनी या पद्धतीबाबत गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या मते, प्लास्टिकच्या फुग्यांमध्ये गॅस साठवणे अत्यंत जोखमीचे असून, किंचित ठिणगी, उष्णता किंवा घर्षणामुळेही मोठा स्फोट होऊ शकतो.दाट लोकवस्तीच्या भागात अशा प्रकारे गॅस साठवणे म्हणजे मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देण्यासारखे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. घरांमध्ये असे गॅसने भरलेले फुगे ठेवल्याने आग लागण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून ही परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणीही करण्यात येत आहे. ऊर्जेच्या पुरवठ्यावर परिणाम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय तणावामुळे ही समस्या अधिक तीव्र झाल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे पाकिस्तानातील सामान्य नागरिकांना महागाईसोबतच इंधन टंचाईचा दुहेरी फटका सहन करावा लागत आहे.