धुळे,
High Court recruitment exam उच्च न्यायालयातील लिपिक आणि शिपाई पदांच्या भरती परीक्षेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गैरप्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार धुळे येथे उघडकीस आला आहे. परीक्षेदरम्यान मोबाईल फोन आणि ‘एआय’ साधनांच्या मदतीने कॉपी करताना एका उमेदवाराला रंगेहात पकडण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २६ एप्रिल रोजी शहरातील जिजामाता कन्या हायस्कूल येथील परीक्षा केंद्रावर घडली. उच्च न्यायालयाच्या लिपिक व शिपाई पदांसाठी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परीक्षेच्या सुरुवातीला सर्व उमेदवारांना मोबाईलसह कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण परीक्षा केंद्रात आणण्यास सक्त मनाई असल्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र, या नियमांकडे दुर्लक्ष करत एका उमेदवाराने चतुराईने मोबाईलचा वापर करून गैरप्रकार केल्याचे तपासात समोर आले आहे.
परीक्षा सुरू असताना निरीक्षकांना एका खोलीत संशयास्पद हालचाली दिसून आल्या. संबंधित उमेदवार मोबाईलमध्ये पाहत उत्तरपत्रिका सोडवत असल्याचे आढळले. याची माहिती तत्काळ परीक्षा पर्यवेक्षकांना देण्यात आली. त्यानंतर तपासणी केली असता संबंधित उमेदवाराकडे मोबाईल फोन आढळून आला. त्यामध्ये प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून तो इंटरनेटवर, विशेषतः ‘गुगल’ आणि एआय-आधारित साधनांवर अपलोड करून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले.
परीक्षा केंद्र प्रशासनाने High Court recruitment exam तातडीने मोबाईल जप्त करून उमेदवाराची उत्तरपत्रिका रद्द केली. या प्रकरणाची माहिती केंद्र संचालकांना देण्यात आली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.या तक्रारीनुसार, उमेदवारावर फसवणूक आणि स्पर्धा परीक्षा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. धुळे शहर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, या प्रकरणामागे कोणती संगनमताची किंवा तांत्रिक मदत आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.या घटनेमुळे स्पर्धा परीक्षांमध्ये वाढत्या तंत्रज्ञानाच्या गैरवापराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. परीक्षांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी अधिक कठोर सुरक्षा उपाययोजना आवश्यक असल्याची चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे.