वॉशिंग्टन,
India's strong role in the United Nations संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताने होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य करणे अत्यंत चुकीचे असून असे प्रकार अस्वीकार्य असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. या चर्चेत भारताच्या उपस्थायी प्रतिनिधी योजना पटेल यांनी निवेदन सादर करताना सांगितले की, होर्मुझची सामुद्रधुनी ही भारतासाठी ऊर्जा पुरवठा आणि व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या भागातील नौवहन सुरक्षित आणि निर्बाध राहणे आवश्यक आहे. व्यापारी जहाजांवर लष्करी हल्ले होणे हे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असून त्याचा निषेध केला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
योजना पटेल यांनी पुढे सांगितले की, अशा घटनांमध्ये केवळ व्यापारालाच नव्हे तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होतो. काही प्रसंगी भारतीय खलाशांनीही अशा संघर्षांमध्ये आपले प्राण गमावल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करून समुद्री मार्ग सुरक्षित ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.भारताने या चर्चेत असेही स्पष्ट केले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जागतिक व्यापारावर या तणावाचा मोठा परिणाम होऊ शकतो. ऊर्जा पुरवठा, अन्न सुरक्षा आणि जागतिक अर्थव्यवस्था यावरही याचे दुष्परिणाम दिसून येऊ शकतात. त्यामुळे तातडीने या भागातील परिस्थिती स्थिर करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
योजना पटेल यांनी भारताच्या भौगोलिक आणि आर्थिक हितसंबंधांवरही भर दिला. आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक कार्यरत असून त्यांची सुरक्षा भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हा प्रदेश भारताच्या ऊर्जा आणि व्यापार साखळीशी थेट जोडलेला असल्याने येथील स्थिरता भारतासाठी निर्णायक असल्याचेही त्यांनी नमूद केले. याच वेळी शांतता राखणाऱ्या आंतरराष्ट्रीय दलांवरील हल्ल्यांवरही भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा हल्ल्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भारताने केली आहे. दरम्यान, या सागरी भागातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणनेही संयुक्त राष्ट्रांकडे तक्रार दाखल केल्याचे समोर आले आहे.