अमरावती,
bribery-case : सोलर रूट ऑफ विक्री व पुरवठ्याची नोंदणी करून घेण्यासाठी लाच मागणार्या महावितरणच्या अभियंत्याला व संगणक परिचालकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई आज करण्यात आली. बाळासाहेब दिगंबर खंडारे (वय ४८ वर्ष, व्यवसाय नोकरी उपकार्यकारी अभियंता महावितरण), श्याम कुमार पांडुरंग इजाटे (वय ४२ वर्ष, संगणक परिचालक रा. स्वावलंबी नगर) असे अटकेतल्या आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार हा ३७ वर्षाचा असून तो सोलर पॅनल फिटिंगचे काम करतो. त्याने १६ मार्च रोजी अधीक्षक अभियंता कार्यालय महावितरण अमरावती येथे ग्रीन एनर्जी नावाने सोलर रूट ऑफ विक्री व पुरवठा यांच्या नोंदणी बाबतचा अर्ज केला होता. तक्रारदार यांची नोंदणी करून घेण्यासाठी उपरोक्त अभियंत्याने तक्रारदाराला वीस हजाराची लाच मागितली. त्यानंतर त्याने तशी तक्रार एसीबीच्या कार्यालयात केली. तक्रारीनुसार २८ एप्रिलला शासकीय पंचासमक्ष पडताळणी केली असता दोघांनी पण तक्रारदाराला १५ हजार लाच मागितल्या स्पष्ट झाले. सापळा कारवाई दरम्यान श्याम कुमार इजाटे यांनी लाचेची रक्कम पंधरा हजार रुपये स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले अंगझडती घेतली असता मोटो कंपनीचा मोबाईल, काही कागद, ६०० रुपये मिळाले. आरोपीची घर झडती घेण्याची प्रकिया सुरु आहे. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक मंगेश मोहोड यांच्या नेतृत्वात करण्यात आली.