संतोष देशमुख कुटुंबाला 'मतपेटीतून धक्का'

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
बीड,
Ashwini Deshmukh बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावात सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत अनपेक्षित निकाल लागल्याने गावात तसेच परिसरात चर्चेला उधाण आले आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण गाव त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत मतपेटीतून त्याच कुटुंबाला अपेक्षित साथ न मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
 

Ashwini Deshmukh 
९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या झाली होती. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह काही जण सध्या तुरुंगात असून खटला न्यायप्रविष्ट आहे. या हत्येच्या निषेधार्थ बीडसह राज्यभरात मोठ्या प्रमाणावर मोर्चे काढण्यात आले होते. मस्साजोग गावातील नागरिकांनीही एकजुटीने संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आंदोलन केले होते.या पार्श्वभूमीवर सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी निवडणूक लढवली होती. गावकऱ्यांकडून सहानुभूतीची लाट मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र निकालात सेनानंद देशमुख यांनी विजय मिळवत सरपंचपद पटकावले. या निकालाने अनेकांना धक्का बसला आहे.
 
 
गावाने भावनिक पातळीवर Ashwini Deshmukh संतोष देशमुख कुटुंबाला पाठिंबा दिला असला, तरी मतदारांनी मतदान करताना वेगळा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले. याबाबत प्रतिक्रिया देताना धनंजय देशमुख यांनी सांगितले की, “गावातील अनेकांना वाटते की तेही हे काम करू शकतात. भाऊ गेल्यानंतर काही ठिकाणी आमची गावाशी असलेली नाळ तुटल्यासारखी वाटली. काही गैरसमजही निर्माण झाले असावेत. आम्ही कोणावरही पैसे वाटपाचा आरोप केलेला नाही.”दरम्यान, विजयी उमेदवार सेनानंद देशमुख यांनी विजय मिळवल्यानंतर संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदर व्यक्त केला. यावेळी गावातील प्रमुख नागरिक आणि समर्थक उपस्थित होते. त्यांनी गावाच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.या संपूर्ण घडामोडींमुळे एक प्रश्न पुन्हा पुढे आला आहे भावनिक पाठिंबा आणि प्रत्यक्ष मतदान यामध्ये इतका फरक का पडतो? मस्साजोगमधील हा निकाल केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित नसून, ग्रामीण भागातील मतदारांच्या बदलत्या मानसिकतेचेही संकेत देणारा ठरत आहे.