गोंदिया,
accident : कोहमारा ते नवेगावबांध राज्य महामार्ग क्रमांक ११ वर कनेरी नाल्याजवळ बुधवारी दुपारी सुमारे १२.१५ वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडून आई व चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

शुभांगी पितांबर लांजेवार (३०) व रियांश पितांबर लांजेवार (९) अशी मृतांची नावे असून पितांबर प्रकाश लांजेवार (३५) असे जखमीचे नाव आहे. तिघेही दुचाकी क्रमांक एमएच ३५ एएम ७३४८ ने नवेगावबांधकडून कोहमाराकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात आरोपी ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात शुभांगी व रियांश यांचा जागीच मृत्यू झाला. तर पितांबर लांजेवार (३५) हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच डोंगरगाव पोलिस केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू बस्तवाडे, पोलिस उपनिरीक्षक मट्टामी व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातानंतर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र नंतर सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी डुग्गीपार पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून अज्ञात ट्रक चालकाचा शोध सुरू आहे.