मुंबई,
Mumbai Pune expressway मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी ठरलेल्या यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, हा नवा मार्ग 1 मे 2026 पासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे घेतलेल्या निर्णयानुसार हा मार्ग टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.
अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंखे यांनी यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. पहिल्या टप्प्यात 1 मे ते 31 मे 2026 या कालावधीत केवळ हलकी मोटार वाहने , बस आणि इतर प्रवासी वाहनांनाच या मार्गावरून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. या कालावधीत मालवाहू वाहनांना पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.
यानंतर 1 जून 2026 पासून दुसरा टप्पा सुरू होणार असून, त्यामध्ये हलकी वाहने आणि बससाठी मार्ग खुला राहणार आहे. मात्र मालवाहू वाहनांना प्रवेश द्यायचा की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय सहा महिन्यांच्या निरीक्षणानंतर घेतला जाणार आहे.सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गावर कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. विशेषतः बोगद्यांमधून ज्वलनशील, स्फोटक किंवा धोकादायक वस्तू वाहून नेणाऱ्या ‘हॅझमॅट’ वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अशा वाहनांना जुन्या द्रुतगती मार्गाचा वापर करणे बंधनकारक असेल.
वेगमर्यादेबाबतही स्पष्ट Mumbai Pune expressway नियम निश्चित करण्यात आले असून, बोगद्यांमध्ये हलक्या वाहनांसाठी कमाल 100 किमी प्रतितास आणि बस तसेच प्रवासी वाहनांसाठी 80 किमी प्रतितास इतकी मर्यादा लागू असेल. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. मात्र निर्धारित मर्यादेपेक्षा 5 टक्क्यांपर्यंत अधिक वेग आढळल्यास त्यास कायदेशीर सवलत दिली जाईल.या प्रकल्पामुळे घाट मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून मुंबई–पुणे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या घटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने प्रवाशांना सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. हा आदेश पुढील सूचनेपर्यंत लागू राहणार आहे.