दिवेआगारमध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
रायगड,
NCP's decline in Diveagar रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होताच श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे मोठी राजकीय उलथापालथ झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या गावात पक्षाला अनपेक्षित पराभवाचा धक्का बसला आहे. ‘दिवेआगार विकास आघाडी’च्या विजय तोडणकर यांनी सरपंचपदावर विजय मिळवत राष्ट्रवादीच्या दीर्घकाळ टिकलेल्या सत्तेला सुरुंग लावला. या निकालामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना स्वतःच्या गडात मोठा फटका बसल्याचे मानले जात आहे.
 
NCP
 
दिवेआगार ग्रामपंचायत ही अकरा सदस्यांची असून, अनेक वर्षे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र काही सदस्यांच्या पात्रतेवर आक्षेप घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आठ सदस्यांचे पद रद्द केले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या रिक्त जागांसाठी आणि सरपंचपदासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधी गटाने बाजी मारत सरपंचपदासह तीन सदस्यांची जागा जिंकली. या पराभवानंतर काही दिवसांपूर्वी म्हसळा नगरपंचायतीत बसलेल्या धक्क्यानंतर दिवेआगारचा निकाल राष्ट्रवादीसाठी आणखी चिंताजनक ठरला आहे. नवनिर्वाचित सरपंच विजय तोडणकर यांनीही मनमानी आणि लोकांना गृहीत धरणारे राजकारण येथे चालणार नाही, असा इशारा देत तटकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
नंदुरबारमध्ये भरत गावितांच्या पॅनलचा दमदार विजय
दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामपंचायत निवडणुकीतही लक्षवेधी निकाल समोर आला. येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित यांच्या पॅनलने दमदार विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली. सरपंचपदाच्या निवडणुकीत दिपाली जगदीश गावित यांनी तब्बल अकराशे मतांच्या फरकाने विजय मिळवला. या निवडणुकीत अनेक विद्यमान आणि माजी आमदारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला होता, मात्र गावित गटाने बाजी मारत आपले वर्चस्व दाखवून दिले. नंदुरबार जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या जागांसाठी झालेल्या मतमोजणीत खांडबारा येथील लढत विशेष चर्चेत राहिली. निकाल जाहीर होताच परिसरात गावित समर्थकांनी जल्लोष साजरा केला. या दोन्ही ठिकाणच्या निकालांमुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.