पांढरकवडा स्मशानभूमीत विद्युत दाहिनी व सौर प्रकल्पाची मागणी

पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पांढरकवडा, 
pandharkawada-cemetery : शहरातील स्मशानभूमीत पारंपरिक लाकूड पद्धतीने अंत्यसंस्कार होत असल्याने मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असून त्याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे. एका अंत्यसंस्कारासाठी सुमारे 300 ते 400 किलो लाकूड लागत असल्याने दरवर्षी शेकडो झाडांची कत्तल होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
 
 
k
 
 
 
या पार्श्वभूमीवर पांढरकवडा येथील जागरूक नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकाèयांना निवेदन सादर करून स्मशानभूमीत अत्याधुनिक विद्युत दाहिनी, तसेच सौरऊर्जा पॅनेल प्रणाली बसविण्याची मागणी केली आहे.
 
 
या सुविधेमुळे पर्यावरण संवर्धनास मोठी मदत होणार असून दरवर्षी 500 हून अधिक झाडे वाचू शकतील. तसेच अंत्यसंस्काराची प्रक्रिया केवळ 45 मिनिटांत पूर्ण होऊन प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ पद्धतीने कार्य होईल. लाकडाच्या तुलनेत खर्चही कमी होऊन सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक ताण कमी होणार आहे.
 
 
यासोबतच 5 ते 10 किलोवॅट क्षमतेचे सौरऊर्जा पॅनेल बसविल्यास वीज खर्चात बचत होऊन दाहिनी यंत्रणा स्वयंपूर्णपणे चालविता येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. राज्य शासनाच्या विविध योजना, विशेषतः आमदार, खासदार निधी, स्वच्छ भारत अभियान व वित्त आयोग माध्यमातून अशा प्रकल्पांना अनुदान उपलब्ध असल्याचेही त्यात नमूद आहे.
 
 
ही मागणी तातडीने मान्य करून पांढरकवडा स्मशानभूमीत लवकरात लवकर विद्युत दाहिनी व सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर डॉ. किरण मायी यांच्यासह यश चौधरी, स्वप्नील बोमेनवार, सक्षम मिसाळ आणि रोशन अंबरवार यांच्या सह्या आहेत.