अनिल कांबळे
नागपूर,
prisoners create chaos नागपूर मध्यवर्ती कारागृहातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून शांत हाेते. मात्र, अचानक चार कैद्यांनी गाेंधळ घालत कर्तव्यावर असलेल्या एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करत जखमी केले. या घटनेमुळे कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. मागील काही काळापासून कारागृहात घडत असलेल्या अशा घटनांमुळे एकूण कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहे.

संदीप रमेश काळे (42) असे जखमी झालेल्या कारागृहातील कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर आदर्श ऊफर् पप्पी रमेश खरे (बारा सिग्नल, बाेरकरनगर), रजत राजा तांबे (बारा सिग्नल, बाेरकरनगर), भारत राजेंद्र पंडित (इंदिरानगर), ऋषिकेश मनाेज पेंडले (मेकाेसाबाग) हे आराेपी कैदी आहेत. हे सर्व जण न्यायाधीन कैदी आहेत. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास बडीगाेल येथील बॅरेक क्रमांक 10 जवळ अचानक गाेंधळ सुरू झाला. तेथे कैदी अभय तिवारी व शैलेश बेले यांच्यात शाब्दिक वाद सुरू हाेता. संदीप काळे हे तुरुंग अधिकारी संताेष मदने यांच्यासाेबत तिथे गेले. दाेन्ही कैद्यांना ताब्यात घेण्यात आले व त्यांना ते वरिष्ठ तुरुंग रक्षक जाेगदंड यांच्याकडे घेऊन जात हाेते. अचानक चारही आराेपी कैदी बडीगाेल विभागाच्या यार्ड क्रमांक एकच्या फाटकाजवळ आक्रमक झाले. त्यांनी एकेरी भाषेचा वापर करत त्यांनी काळे यांना पकडले. ‘तू गेट का बंद केले’, असे म्हणत त्यांना बुक्क्यांनी मारहाण केली. आवाज ऐकून संताेष मदने तेथे धावत गेले व ते कैद्यांना समजावून सांगत हाेते. मात्र, कैद्यांनी त्यांनादेखील शिवीगाळ केली व धक्काबुक्की केली.prisoners create chaos दरम्यान, एका कैद्याने काळे यांना धातूच्या वस्तूने मारले व त्यात त्यांच्या करंगळीतून रक्त येऊ लागले. त्यांना तातडीने रुग्णालयात पाठविण्यात आले व आराेपी कैद्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी कारागृह विभाग आणि पाेलिस विभाग माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याची माहिती आहे.