नागपूर,
school in heat wave विदर्भात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर १५ जूनपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त होत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तापमान ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असताना, अशा परिस्थितीत लहान विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे धोकादायक ठरू शकते, अशी चिंता पालक व शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष नागो गाणार यांनी मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र पाठवून १५ जूनचा निर्णय रद्द करून नेहमीप्रमाणे २६ जूननंतरच शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांचे वय ६ ते १७ वर्षे असल्याने ते तीव्र उष्णतेस अधिक संवेदनशील असतात. अनेक शाळांमध्ये पुरेशा पाण्याची, सावलीची व मूलभूत सुविधांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानेही परिस्थितीची दखल घेत शाळांचे वेळापत्रक सकाळी ७ ते १०:३० या मर्यादित वेळेत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, हे उपाय अपुरे ठरत असल्याचे मत व्यक्त होत आहे. शिक्षण संचालनालयाने २८ मार्च रोजी काढलेल्या आदेशानुसार १५ जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, तो न्यायालयीन निर्देशांच्या विरोधात असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समायोजन प्रक्रियेवरूनही वाद निर्माण झाला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही ही प्रक्रिया सुरूच ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.school in heat wave या सर्व पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे हित आणि सुरक्षितता लक्षात घेऊन शासनाने तातडीने निर्णय बदलावा, अशी मागणी जोर धरत आहे.