कोल्हापूर,
kolhapur-girl-exploitation-case : कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा अत्यंत गंभीर आणि खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली परिसरात एका तरुणाने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहिद समीर सनदे (वय २२) या आरोपीने जवळपास १५ पेक्षा अधिक तरुणींना फसवून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. तो त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढत असे, तसेच हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्यावर दबाव टाकत असल्याचेही समोर आले आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पोलिसांनी आणखी एका तरुणाला अटक केली आहे. शाहरुख देसाई असे त्याचे नाव असून तो आरोपी शाहिदचा जवळचा साथीदार असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी त्याला साताऱ्यातील कराड येथून ताब्यात घेतले आहे. यापूर्वीही त्याच्यावर काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून आरोपींच्या घरावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. घरातील पाणी आणि वीज पुरवठाही बंद केल्याची माहिती मिळते. दरम्यान, पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.