शेतातून थेट ग्राहकांपर्यंत फळांचा स्मार्ट बाजार

नागपूर विद्यापीठाच्या संशोधनातून ‘स्वयंचलित विक्री यंत्रा’ची भन्नाट कल्पना

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
नागपूर,
rashtrasant tukadoji maharaj nagpur university शेतकऱ्यांच्या मेहनतीचे फळ थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावे आणि त्यांना योग्य मोबदला मिळावा, या उद्देशाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील संशोधकांनी एक अभिनव उपाय शोधला आहे. भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय ढोबळे आणि संशोधक विद्यार्थी आदित्य जगदाळे यांनी फळांसाठी विशेष ‘स्वयंचलित विक्री यंत्र’ विकसित केले असून या संकल्पनेला भारत सरकारकडून डिझाईन नोंदणी प्रमाणपत्रही मिळाले आहे.
 

स्वयंचलित विक्री यंत्र 
 
 
आजवर स्वयंचलित विक्री यंत्रांचा वापर प्रामुख्याने पेय पदार्थांसाठी होत होता. मात्र या नवकल्पनेमुळे आता शेतातील ताजी फळे थेट सार्वजनिक ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. बसस्थानके, रेल्वे स्थानके, रुग्णालये, कॅन्टीन आणि व्यापारी संकुले अशा विविध ठिकाणी ही यंत्रे उभारता येतील. यंत्रात ठेवलेली संत्री, मोसंबी, सफरचंद यांसारखी फळे पारदर्शक पद्धतीने ग्राहकांना दिसतील आणि १८ अंश सेल्सिअस तापमानात ताजी ठेवली जातील.
या यंत्रात तीन ते चार कप्प्यांची व्यवस्था असून विविध प्रकारची फळे साठवता येतात. ग्राहकांना नगद किंवा क्यूआर संकेताद्वारे पैसे देऊन फळे खरेदी करता येणार आहेत. एकदा यंत्रात फळे भरल्यानंतर ८ ते १० तास विक्री सुरू राहू शकते, त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे. फळे खराब न होता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचल्याने नुकसान कमी होईल आणि उत्पन्न वाढेल.
डॉ. ढोबळे यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे तरुण पिढीला थंड पेयांऐवजी आरोग्यदायी फळांकडे वळण्यास प्रोत्साहन मिळेल. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.rashtrasant tukadoji maharaj nagpur university विद्यापीठाचे कार्य केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसून समाजोपयोगी संशोधन करणे हेही ध्येय असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या संशोधनासाठी कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्यासह विद्यापीठाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी संशोधकांचे अभिनंदन केले असून भविष्यातही शेतकऱ्यांसाठी अशाच उपयुक्त नवकल्पना साकाराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.