नवी दिल्ली,
sri-lanka-cricket : २९ एप्रिल रोजी श्रीलंकन क्रिकेटमध्ये एक मोठी उलथापालथ झाली, ज्याची काही काळापासून अपेक्षा होती. श्रीलंका क्रिकेटचे (SLC) अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ही माहिती श्रीलंका क्रिकेटने अधिकृतपणे जाहीर केली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी अलीकडेच मंडळात बदलांची गरज असल्याचे सांगितले होते आणि त्यांच्या या वक्तव्यालाच हा प्रतिसाद असल्याचे मानले जात आहे.
श्रीलंकन क्रिकेटमधील या उलथापालथीसंदर्भात SLC ने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात हे देखील स्पष्ट केले आहे की, सर्व राजीनामे तात्काळ प्रभावाने स्वीकारण्यात आले असून एक अंतरिम समिती मंडळाचा कार्यभार सांभाळेल. SLC ने जाहीर केले की, श्रीलंका क्रिकेटचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबतच, SLC कार्यकारी समितीचे अधिकारी आणि सदस्यांनीही राजीनामा दिला आहे. हा निर्णय राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके आणि माननीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री सुनील कुमार गमागे यांना औपचारिकपणे कळवण्यात आला आहे.
२८ एप्रिल रोजी झालेल्या एसएलसी कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर या सर्वांनी राजीनामा दिला. श्रीलंका सरकार आता माजी खासदार एरन विक्रमरत्ने यांची काही कालावधीसाठी या संस्थेचे अंतरिम प्रमुख म्हणून नियुक्ती करू शकते.
शम्मी सिल्वा यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये थिलंगा सुमाथिपाला यांची जागा घेत श्रीलंका क्रिकेटच्या अध्यक्षपदाची सूत्रे प्रथम स्वीकारली. शम्मी सिल्वा यांच्या कार्यकाळात, श्रीलंकेच्या पुरुष आणि महिला संघांनी आशियाई चषक विजेतेपद पटकावले, परंतु आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्यात ते अपयशी ठरले. पुरुष संघाच्या कामगिरीत सर्वात मोठी घसरण दिसून आली. २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील श्रीलंका संघाची कामगिरीही निराशाजनक होती.