‘अँड्रॉइड १२’ च्या सक्तीने शिक्षक अडचणीत

नवीन मोबाईल खरेदी करावे लागणार

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
अमरावती, 
android-12 : आगामी जनगणना प्रक्रियेच्या पृष्ठभूमीवर अमरावती जिल्ह्यात शिक्षकांचे प्रशिक्षण वेगाने सुरू असून, यासाठी वापरल्या जाणार्‍या मोबाईल अ‍ॅपसाठी किमान अँड्रॉईड १२ ही अट अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांचे विद्यमान मोबाईल निष्प्रभ ठरत असून, नव्याने मोबाईल खरेदी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
 
 
kl
 
 
 
‘बीवायओडी’ धोरणांतर्गत शासनाकडून कोणतीही साधनसामग्री न देता शिक्षकांनी स्वतःच्या मोबाईलवरच जनगणनेचे काम करावे, अशी अपेक्षा ठेवण्यात आली आहे. यामुळे शासनाची जबाबदारी शिक्षकांवर ढकलली जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. अमरावती जिल्ह्यासह तालुक्यात सुरू असलेल्या प्रशिक्षणात जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया शिक्षकांना समजावून सांगितली जात आहे. प्रत्येक शिक्षकाला ठराविक क्षेत्र देण्यात येणार असून, उन्हाळ्याच्या सुटीत गावोगावी घरोघरी जाऊन माहिती संकलन करावे लागणार आहे.
 
 
ही प्रक्रिया १५ मे ते १६ जून दरम्यान राबवली जाणार आहे. कुटुंबातील सदस्यांची संख्या, वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय, स्थलांतर, निवास स्थिती यासह विविध माहिती मोबाईल अ‍ॅपमध्ये नोंदवावी लागणार आहे. तसेच प्रत्येक घराचे जीपीएस लोकेशन, घराचा प्रकार, पाणी, वीज, शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधांची माहितीही अ‍ॅपवर अपलोड करावी लागणार आहे. काही ठिकाणी घरांचे फोटो अपलोड करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती शिक्षकांनी दिली.
 
 
या संपूर्ण प्रक्रियेसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी, मोबाईलची क्षमता आणि अद्ययावत सॉफ्टवेअर आवश्यक असल्याने शिक्षकांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.