ट्रान्सलोकेटेड ट्री नर्सरी...

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
वेध....
विजय निचकवडे
translocated tree nursery काय कसे आहात? काय म्हणालात, उन्हाचे चटके जाणवताहेत! पण काय करणार ना? आपलं दुखणं सांगणार कुणाला? या चाटक्यांची दाहकता वाढविण्यात आपलाही वाटा सिंहाचा आहे. आपल्याला विकास हवा... पण विकास करताना डोळ्यासमोर होणाऱ्या विनाशावर आपण बोलतो का हो? आपण तिथे बोलत नाही, पण त्या सूर्याला मात्र ‘बोल’ लावून मोकळे होतो... मेला खूप तापतोय म्हणून! पण तो का तापतो, याचा कधी विचार केलाय का? झाडं डोळ्यादेखत कापली जात असताना आपल्या मनाला वेदना होतात का? काहींच्या संवेदना जिवंत असतीलही, पण प्रशासनातील कर्त्या-करविरत्यांच्या संवेदनांचे काय? मागचा-पुढचा, ना कुठल्या पर्यायाचा विचार करता थेट झाडे कापण्याची परवानगी देणाऱ्यांनाही उन्हाचे चटके बसतच असतील ना? मग का नाही वेगळेपणाची किनार विकासाला देण्याचा प्रयत्न होत! आपण भारतातच राहतो... एका राज्यात सहा हजारांहून अधिक झाडांचे पुनर्रोपण करण्याचा धाडशी प्रयोग होत असेल, तर आमच्याकडे कित्येक दशके वाटसरूंना सावली देणाऱ्या झाडांचा जीव का घेतला जातो. काम सोपं करण्याच्या नादात निसर्गाप्रति आपल्यात आलेला कृतघ्न भाव आपल्याच ‘भावी’ पिढीचे भवितव्य ‘भस्म’ करते आहे, हे नक्की!

‘ट्रान्सलोकेटेड ट्री नर्सरी’
‘ट्रान्सलोकेटेड ट्री नर्सरी’ म्हणजेच पुनर्स्थापित वृक्ष रोपवाटिका अनेक प्रश्नांचे एकमेव उत्तर ठरू शकते. बस, सोपा मार्ग स्वीकारून शाश्वत विकासाचे अवास्तव स्वप्न पाहण्याची मानसिकता तेवढी बदलायला हवी. वाटायला, प्रत्येकालाच वाटतं, झाडं कापली जाऊ नयेत, पण त्यासाठी प्रयत्न करणारे किंवा यासाठी पुढे येणारे किती आहेत, हा प्रश्नच आहे. विकास कोणाला नको आहे, पण तो करताना ‘विनाश’ नको व्हायला, याचीही काळजी घ्यावीच लागेल ना? जो निसर्ग आपल्याला नि:स्वार्थ भावनेने सर्वस्व देतो, वेळ आल्यावर आपण आपल्या स्वार्थासाठी त्याच्या या नि:स्वार्थ सेवेची परतफेड त्याच्याच ‘मुळा’वर घाव घालून करतो. राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे सुरू असलेल्या कामात 80 ते 120 वर्षे जुनी शेकडो झाडे कापून जो कृतघ्न भाव यंत्रणेने निसर्गाप्रति दाखविलाय, तो चिंतनीय असाच आहे. जे भंडाऱ्यात घडतंय, ते भविष्यात आणखी कुठे घडेल. कदाचित अनेक ठिकाणी हे घडूनही गेलं असेल. पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या सर्व गोष्टी करताना कधीतरी झाडांचा जीव न घेता ‘मार्ग’ निघू शकतो का? याचा विचार उच्चविद्याविभूषित अधिकारी, नियोजनकर्ते यांच्याकडून झाला आहे का? दुर्दैवाने हे होत नाही, हेच वास्तव आहे. काम सोपं आणि सुटसुटीत करण्याच्या नादात वृक्ष कापण्यासाठी दिली जाणारी परवानगी म्हणजे आपल्या निसर्गाप्रतिच्या उदासीनतेची परमोच्च पातळी म्हणावी लागेल. पर्याय शोधणे, झाड न कापता त्याचे पुनर्रोपण करणे यावर कधी चिंतन, मंथन करण्याचा विचारही डोक्यात येतो का हो? 100 वर्षे जुने एखाद झाड कापताना जर कुणालाच दुःख होत नसेल तर ही असंवेदनशीलता नक्कीच घातक आहे.
आज आमच्याकडे निसर्गाप्रतिची संवेदनशीलता दिसत नसली, तरी भारताचाच एक अविभाज्य घटक असलेल्या आंध्र प्रदेशात मात्र त्यांनी हे करून दाखविले. विकास त्यांनीही केला, पण तो झाडावर कुèहाड चालवून नाही, तर त्यांचे पुनर्रोपण करून, त्यांना जगवून! आंध्र प्रदेशातील अमरावती येथे देशातील पहिली ट्रान्सलोकेटेड ट्री नर्सरी म्हणजे पुनर्स्थापित वृक्ष रोपवाटिका तेथील अमरावती विकास महामंडळाने तयार केली. विकासाच्या आड येणारी झाडे मुळासकट काढून त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने जतन करून जगविले गेले. वयाच्या 15 वर्षांपासून ते 30-40 वर्षांर्पर्यंतच्या झाडांना वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून जमिनीतून काढून एका विशिष्ट प्रकारच्या बॅगमध्ये काही वर्षे जगवून पुनर्रोपण करण्याचा अनोखा प्रयोग येथे सुरू आहे. आज सहा हजारांहून अधिक झाडांचे पुनर्रोपण झाले. वड, पिंपळ, चिंच, आवळा, बहावा अशा अनेक झाडांना तेथील अधिकाèयांच्या संवेदनशीलतेने जीवनदान दिले. जागतिक बँकेने कौतूक केले. आशियाई विकास बँकेच्या 13 सदस्यांच्या पथकाने या प्रकल्पाला भेट देत जागतिक स्तरावर अनुकरणीय असा प्रकल्प असल्याचे सांगितले. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दखल घेत ‘अमरावती’ मॉडेल शासकीय यंत्रणेने राबवा असे सांगितले.translocated tree nursery मग जे आंध्र प्रदेशात शक्य होऊ शकले, ते आपल्याकडे का नाही? आम्हीसुद्धा कधीकाळी पालखी मार्गासाठी 1025 वडाच्या झाडांचे पुनर्रोपण केले आहे. नागपुरात 188 वर्षे जुने वडाचे झाड काढून गोरेवाडा जैवविविधता प्रकल्पात लावले आहे. जर आम्ही करू शकतो तर, त्या दृष्टीने प्रयत्न का होत नाहीत. आज आम्हाला मानसिकता बदलण्याची गरज आहे. सोप्याच्या मागे जाताना, सर्वस्व गमावून बसण्याआधी भानावर न आल्यास सूर्याला ‘बोल’ लावण्यासाठीही आपण वाचणार नाही, हे नक्की!
9763713417
...