उकणी प्रकल्पग्रस्तांचे चक्काजाम आंदोलन

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी, 
ukani-project-victims-strike : तालुक्यातील उकणी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने स्थानिक युवक-युवतींना रोजगार व न्याय मिळवून देण्यासाठी रविवार, 3 मेपासून चक्काजाम पुकारण्यात येणार आहे. या आंदोलनाला खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
 
 
 
ukani-project-victims-strike
 
 
 
या संदर्भात सादर करण्यात आलेल्या निवेदनात उकणी येथील सुशिक्षित, कुशल, अकुशल तसेच बेरोजगार युवक-युवती आणि जडवाहन परवानाधारक चालकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
 
 
उकणी परिसरातील सुमारे 200 हून अधिक कामगारांना नारायण अ‍ॅण्ड सन्स या कंपनीमध्ये प्राधान्याने नोकरी देण्याची मागणीही दीर्घकाळापासून आहे. मात्र, कंपनी व्यवस्थापनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने स्थानिक युवकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
 
 
प्रकल्पामुळे प्रभावित कुटुंबांना रोजगार देणे ही कंपनीची सामाजिक जबाबदारी असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. दरम्यान, उकणी कोळसा खाण व पुनर्वसन प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने कंपनीला 3 मेपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे.
 
 
या कालावधीत मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र स्वरूपाचे चक्काजाम आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा समितीने दिला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून स्थानिकांना न्याय मिळवून देण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला आहे.
 
 
या पार्श्वभूमीवर खा. प्रतीभा धानोरकर यांनी संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत निवेदन स्वीकारले. संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक त्या पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रशासन व कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य मागण्यांसाठी आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असेही त्यांनी सांगितले.
 
 
यावेळी समितीचे अध्यक्ष स्वप्नील गोवारदीपे, उपाध्यक्ष अजय खाडे, सचिव विजय कार्लेकर, कार्याध्यक्ष विनायक येसेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.