विद्यापीठ व महाविद्यालय कर्मचार्‍यांचा एल्गार

-१४ मे पासून राज्यव्यापी आंदोलन -४ जूनपासून बेमुदत संप

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
अमरावती, 
university-college-staffs-elgar : महाराष्ट्र राज्यातील अकृषी विद्यापीठीय व महाविद्यालयीन कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. २७ एप्रिल रोजी जळगाव येथे झालेल्या महत्त्वपूर्ण सभेत आंदोलनाची पुढील दिशा आणि धोरण निश्चित करण्यात आले असून, मागण्या मान्य न झाल्यास ४ जूनपासून राज्यभरातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
 
 
amt
 
 
 
या सभेच्या अध्यक्षस्थानी संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष अजय देशमुख होते. मंचावर प्रमुख उपस्थित म्हणून मिलींद भोसले, रावसाहेब त्रिभुवन, दिनेश दखणे, संदीप हिवरकर, सतीश वाघमारे तसेच जळगाव विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे सचिव अरूण सपकाळे उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष अजय देशमुख यांनी प्रलंबित बाबींसंदर्भात शासनस्तरावर सध्याच्या स्थितीचे सविस्तर विवेचन कर्मचार्‍यांसमोर मांडले.
 
 
सभेत ठरल्यानुसार, १४ मे ते १६ मे काळ्या फिती लावून कामकाजात सहभाग नोंदवणे, १७ मे ते १९ मे दुपारी २ ते २:५० या वेळेत घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करणे, २१ मे रोजी लेखणी बंद आंदोलन, २५ मे रोजी स्थानिक सहसंचालक कार्यालयासमोर प्रातिनिधिक स्वरूपातील लाक्षणिक आंदोलन, २८ मे रोजी एकदिवसीय लाक्षणिक संप व ४ जूनपासून मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येईल.
 
 
तीन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करणे, वंचित असलेल्या कर्मचार्‍यांना ७ वा वेतन आयोग लागू करणे, त्यावर आधारित रजा रोखीकरण मंजूर करणे, ‘कॅशलेस’ वैद्यकीय सुविधा लागू करणे, प्रयोगशाळा सहाय्यक व परिचरांना रजा रोखीकरण, शिक्षकेतर कर्मचार्‍यांची रिक्त पदे भरणे, सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करणे व ५ दिवसांचा आठवडा लागू करणे, या मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे.