नागपूर,
university timetable उन्हाचा कडाका वाढत असतानाच शहरातील विद्यार्थ्यांसमोर परीक्षा द्यायची की संधी गमवायची? हा मोठा संकट उद्भवला आहे. रातुम नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक आणि विविध महत्त्वाच्या प्रवेश व स्पर्धा परीक्षांच्या तारखा एकाच वेळी आल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम आणि तणाव निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर सिनेट सदस्य ॲड. मनमोहन वाजपेयी यांनी नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांना निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, संघ लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा यांसारख्या महत्त्वाच्या परीक्षांशी विद्यापीठाच्या परीक्षांचा संघर्ष टाळणे अत्यावश्यक आहे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा मे महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू होत असताना, अनेक अभ्यासक्रमांचे पेपर इतर व्यावसायिक परीक्षांच्या तारखांवर येत असल्याचे समोर आले आहे. विशेषतः वाणिज्य पदव्युत्तर अभ्यासक्रम, संशोधन प्रवेश परीक्षा आणि लेखा अभ्यासक्रमाच्या परीक्षा एकाच कालावधीत येत असल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठे द्वंद्व निर्माण झाले आहे. काही विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी अंतिम सत्राची परीक्षा आणि प्रवेश परीक्षा एकाच दिवशी असल्याने एक परीक्षा निवडण्याची वेळ आली आहे.
याशिवाय, हिवाळी परीक्षांचे निकाल उशिरा लागणे, काही निकाल प्रलंबित राहणे आणि त्रुटी आढळणे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आधीच अस्वस्थता आहे. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी वेळेवर निकाल मिळणे अत्यंत गरजेचे असताना ही परिस्थिती अधिकच चिंताजनक ठरत आहे.
वाजपेयी यांनी सुचवले की, अनुभवी प्राचार्य, प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून परीक्षा व निकाल प्रक्रिया युद्धपातळीवर पार पाडावी.university timetable तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांमध्ये अपरिहार्य संघर्ष निर्माण झाला आहे, त्यांना पुराव्यानुसार विशेष परीक्षा देण्याची संधी द्यावी.
दरम्यान, कुलगुरू डॉ. क्षीरसागर यांनी सांगितले की, ओव्हरलॅप झालेल्या परीक्षांचा अभ्यास सुरू असून, प्रभावित विद्यार्थ्यांना अर्जाच्या आधारे दिलासा देण्याचा विचार केला जाईल.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.