तभा वृत्तसेवा
वणी,
vani-premium-league : शासकीय मैदानावर सुरू असलेल्या ‘वणी प्रीमियम लीग मनसे चषक 2026’ क्रिकेट स्पर्धेचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत ‘झीहू 11’ संघाने विजेतेपदावर मोहोर उमटवली. विजेत्या संघाला 4 लाख रुपये रोख व मानाचा चषक प्रदान करण्यात आला. तर यवतमाळच्या ‘नाईट रायडर्स’ संघाने उपविजेतेपदासह 2 लाख 51 हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.
मनसे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्पर्धेचा शुभारंभ 10 एप्रिल रोजी आमदार संजय देरकर व राजू उंबरकर यांच्या हस्ते करण्यात आला होता. बक्षीस वितरण सोहळ्याला राजू उंबरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विजेत्या संघमालकाला दुचाकी मोटारसायकल हे विशेष आकर्षण ठरले.
स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकली. शोएब खानने उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार पटकावला. अथर्वला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले. अष्टपैलू खेळाचे दर्शन घडवणाèया रवी राजुरकरला ‘मालिकावीर’ घोषित करण्यात आले.
कार्यक्रमाला वणी नगर परिषद मुख्याधिकारी सचिन गाडे, उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के, डॉ. महेंद्र लोढा, अविनाश भुजबळराव, इरशाद खान, रमेश पेचे, फाल्गुन गोहोकार, विनोद कुचनकर, राकेश शंकावार, राकेश वैद्य, शुभम भोयर, गोविंद थेरे, परशुराम खंडाळकर, दिलीप मस्के, विलन बोदाडकर, संजय गौरकार, जितेंद्र शिरभाते, अविनाश पाटील, लक्की सोमकुंवर, मयूर घाटोळे, अमोल मसेवार, अनिल टोंगे, प्रवीण कळसकर, आशिष ठावरी व लोकेश लडके यांची उपस्थिती होती.
स्पर्धेसाठी संयोजक समितीचे शैलेश ढोके, नदीम शेख व त्यांच्या सहकाèयांनी परिश्रम घेतले.