कोलकाता,
Voter enthusiasm in Bengal पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज सकाळपासून मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत सुमारे १८.३९ टक्के मतदान नोंदवले गेले असून, काही ठिकाणी तणावाच्या घटनाही समोर आल्या आहेत. नादिया जिल्ह्यात एका राजकीय पक्षाच्या मतदान प्रतिनिधीवर हल्ला झाल्याची माहिती मिळाल्याने वातावरण काहीसे तापले आहे. या टप्प्यात राज्यातील सात जिल्ह्यांमधील १४२ मतदारसंघांमध्ये मतदान होत असून, तब्बल १,४४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तीन कोटींहून अधिक मतदार आपला हक्क बजावत असून, कोलकाता आणि दक्षिणेकडील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये मतदान केंद्रांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर निमलष्करी दल तैनात करण्यात आले असून, शेकडो निरीक्षकही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

या टप्प्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर मतदारसंघ विशेष चर्चेत आहे. हा भाग त्यांच्या राजकीय प्रभावाचा गड मानला जातो, तर विरोधी पक्षासाठीही हा प्रतिष्ठेचा प्रश्न ठरला आहे. त्यामुळे या टप्प्याकडे ‘करा किंवा मरा’ अशा लढतीच्या दृष्टीने पाहिले जात आहे.दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्ष आणि निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत आपल्या कार्यकर्त्यांवर मारहाण होत असल्याचा दावा केला आहे. काल रात्री एका कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा व्हिडिओ दाखवत त्यांनी संताप व्यक्त केला. दुसरीकडे, अभिनेता आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांनी मतदानानंतर प्रतिक्रिया देताना यावेळीही मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली आणि त्याचे परिणाम काय असू शकतात याचे संकेत दिले. तसेच, महुआ मोईत्रा यांनी नादिया येथे मतदान केल्यानंतर पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला, तर अभिषेक बॅनर्जी यांनी निरीक्षकांकडून मतदारांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केला. एकूणच, पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा हा टप्पा अत्यंत चुरशीचा ठरत असून, निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.