वर्धा,
heatwave मागील काही दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात कमालीची वाढ होत आहे. सोमवार २७ रोजी जिल्ह्याच्या तापमानाने ३० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. सोमवारचे तापमान ४६.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेता प्रभारी जिल्हाधिकारी संजय तेली यांनी जिल्ह्यातील शासकीय व खाजगी शिकवणी वर्ग सकाळी किंवा संध्याकाळच्या सत्रात अथवा ऑनलाईन घेण्याचा आदेश निर्गमित केला आहे. त्यामुळे भरदुपारी भरणार्या शिकवणीवर्गाला आता थोडी उसंत मिळणार आहे.
जिल्ह्यात पुढील काही दिवसात उष्मालाटेची परिस्थिती निर्माण होण्याची शयता वर्तविली आहे. या उष्मालाटेच्या पृष्ठभूमीवर प्रभारी जिल्हाधिकारी संजय तेली यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आदेश निर्गमित करून जिल्ह्यातील शासकीय व खाजगी शिकवणी वर्ग सकाळी किंवा संध्याकाळच्या सत्रात अथवा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे आदेश दिले आहे. कुठले शिकवणी वर्ग दुपारी सुरू राहिल्यास त्यावर कारवाई केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ नये म्हणून जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी २२ एप्रिलपासुन जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळी ७ ते १० या वेळेत घेण्याचे निर्देश दिले आहे. पण, शाळा सुटल्यानंतर शासकीय व खाजगी शिकवणी वर्ग भरविले जात असल्याचे निर्दशनास आल्याने दुपारी शिकवणी वर्ग घेण्यार्यांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहे. हा आदेश ३१ मेपर्यंत राहिल. या आदेशाचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.