वर्धा,
Wardha water shortage प्रचंड उष्णतेने नागरिक हैराण असताना आता वर्धा परिसरातील १४ गावांमध्ये काही दिवसांपासून कृत्रिम पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. वारंवार जलवाहिनी गळती आणि अनियमित पाणी पुरवठ्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
गेल्या ५ दिवसांपासून पिपरी (मेघे) सह नजिकच्या गावांतील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. अशातच खोदकामादरम्यान मुख्य जलवाहिनी तोडण्यात आली. त्यामुळे कृत्रिम पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. या रणरणत्या उन्हात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मजिप्राने अनेक भागांत नवीन जलवाहिनी टाकल्या असल्या तरी समस्या कायम आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजने अंतर्गत पिपरी (मेघे), कारला, सिंदी (मेघे), बोरगाव (मेघे), उमरी (मेघे), साटोडा, आलोडी, दत्तपूर, वायगाव निपाणी, नालवाडी, वरूड, म्हसाळा, सालोड हिरापूर आदी गावांना मजिप्रा पाणी पुरवठा करते.
यासंदर्भात मजिप्राचे उपअभियंता दीपक धोटे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, आर्वी मार्गावरील प्रिया पॅलेसजवळ जलवाहिनीला गळती झाली होती. तिची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. सर्व गावांना रोटेशननुसार पाणी पुरवठा सुरू आहे. पुढील दोन दिवसांत सर्व गावांमध्ये नियमित पाणी पुरवठा सुरळीत होईल, असेही त्यांनी सांगितले.