तभा वृत्तसेवा
पारवा,
heatstroke-victim : महाराष्ट्राच्या पश्चिम विदर्भातील प्रत्येक विभागात सूर्य आग ओकत आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून उष्णतेचा कहर पहायला मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पारवा येथून जवळच रामनगर येथे उष्माघाताचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातही सध्या उष्णतेचा कहर असून घाटंजी तालुक्यातील पारवा परिसरातील तापमान 43 ते 44 अंश सेल्सिअसवर गेले आहे. त्यामुळे नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अजून तीन ते चार दिवस अशी उष्णतेची लाट जाणवणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पारवा येथून जवळच रामनगर येथे उष्मघाताचा ग्रामीण भागात बळी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पारवा पोलिस ठाणे हद्दीत रामनगर येथे अनिल नामदेव शेंडे (वय 46) यांच्याबाबत माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाच्या अंगावर कुठल्याही जखमा नाहीत. या व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून मृतदेहाच्या वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचं मूळ कारण स्पष्ट होईल. मात्र पोलिसांनी या मृत्यूमागे उष्माघाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे केळापूर आर्णी विधानसभा क्षेत्रात उष्माघाताचा पहिला बळी गेला असल्याची माहिती आहे.