आमगाव रेल्वे स्थानकाचा भोंगळ कारभार; प्रवाशांच्या हालअपेष्टा
दिनांक :03-Apr-2026
Total Views |
- फलाट क्र. १ वरील लिफ्ट अद्याप बंदच ज्येष्ठ, दिव्यांगांना त्रास
आमगाव,
‘Amgaon Railway Station मॉडेल स्टेशन’ म्हणून विकसित करण्याचा गाजावाजा झालेल्या आमगाव रेल्वे स्थानकातील सुविधांचा मात्र बोजवारा उडाल्याचे वास्तव समोर येत आहे. फलाट क्रमांक १ वरील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग प्रवाशांसाठी ही परिस्थिती अधिकच त्रासदायक ठरत आहे.
‘Amgaon Railway Station रेल्वे प्रशासनाने स्थानकाचे आधुनिकीकरण करताना आकर्षक डिझाईन व सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात या सुविधा कागदोपत्रीच राहिल्याचे दिसून येते. फलाटांमधील अंतर मोठे असल्याने प्रवाशांना एका फलाटावरून दुसर्यावर जाण्यासाठी लांब पल्ल्याचा पायी प्रवास करावा लागतो. यामध्ये लांबलचक पायर्या चढ-उतार करताना अनेकांना अक्षरशः दम लागतो. लिफ्ट बंद असल्यामुळे प्रवाशांना पर्याय म्हणून फक्त जिन्याचाच वापर करावा लागत आहे. गाडी येण्याच्या वेळेत प्रवाशांची धावपळ उडते आणि अनेक वेळा जीव धोक्यात घालून गाडी पकडावी लागते. काही प्रवाशांनी तर गाडी पकडण्यासाठी जीव मुठीत धरावा लागतो, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान, स्थानकाच्या ‘मॉडेल स्टेशन’ या संकल्पनेत प्रवाशांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देण्याऐवजी केवळ बाह्य स्वरूपावर भर दिल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. लिफ्ट, एस्कलेटरसारख्या मूलभूत सुविधांची देखभाल व दुरुस्ती वेळेत होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिक व प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. परिणामी, प्रवाशांचा रोष वाढत असून तात्काळ लिफ्ट सुरू करून स्थानकावरील सर्व सुविधा कार्यान्वित कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. जर वेळेत उपाययोजना न केल्यास प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.