मुंबई,
raja-ravi-varma-oil-painting : शहरातील भव्य कला लिलावाने आधुनिक भारतीय कलेच्या चाहत्यांमध्ये मोठी चर्चा उडवली आहे. राजा रवी वर्मा यांच्या प्रसिद्ध तैलचित्र ‘यशोदा आणि कृष्ण’ या कलाकृतीने विक्रमी किंमत गाठली असून, ही मॉडर्न इंडियन आर्टमधील सर्वात महागडी लिलाव विक्री ठरली आहे.
केशर कलाच्या स्प्रिंग लाईव्ह लिलावात ही कलाकृती तब्बल १६७.२० कोटी रुपयांना विकली गेली. प्रारंभिक अंदाज ८० ते १२० कोटी रुपयांदरम्यान होता, परंतु खरेदीने सर्व अपेक्षा ओलांडल्या.
या कलाकृतीची खरेदी कोरोना लस तयार करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पूनावाला यांनी केली. त्यांनी या खरेदीद्वारे केवळ नवीन विक्रम नाही केला, तर भारतीय कलाप्रेम आणि संस्कृतीबद्दलचा आपला जिव्हाळाही अधोरेखित केला.
चित्रात १८९०च्या दशकात साकारलेले भगवान कृष्ण आणि माता यशोदा यांच्यातील वात्सल्य अप्रतिम पद्धतीने दाखवले आहे. यशोदा गाईचे दूध काढताना, लहान कृष्ण मागून दुधासाठी हात पुढे करताना दिसतो. हा क्षण भारतीय संस्कृतीतील मातृत्व आणि प्रेमाचे प्रतीक मानला जातो. या खरेदीनंतर डॉ. पूनावालांनी सांगितले की, ही कलाकृती योग्य पद्धतीने जतन करून ती भविष्यात जनतेसाठी उपलब्ध करून दिली जाईल.