22 रुद्राक्षांचा डबा, हिरव्या द्रव्याची बाटली भोंदूच्या घरात संशयित वस्तू

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
नाशिक,
Ashok Kharat धार्मिक विधीच्या आडून महिलेला फसवून तिच्यावर अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात संशयित भोंदूबाबा अशोक खरात याला जिल्हा न्यायालयाने पुन्हा पोलिस कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने त्याला ८ एप्रिलपर्यंत सात दिवसांची कोठडी दिली असून, यामुळे यापूर्वी न्यायालयीन कोठडीत असलेल्या खरातची आता दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांकडून सखोल चौकशी केली जाणार आहे.
 

Ashok Kharat  
सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, २०२० ते २०२६ या कालावधीत कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयात पीडित महिलेला बोलावून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपीने तिच्या भविष्याबाबत भीती निर्माण करून तिला आपल्या जाळ्यात ओढले. ‘मंत्र केलेले पाणी’ देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या अत्याचारातून ती गर्भवती राहिल्यानंतर तिला जबरदस्तीने औषधे देऊन गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक आरोपही तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. विरोध केल्यास कुटुंबावर अनिष्ट परिणाम होतील, अशी धमकी देऊन तिला गप्प ठेवण्यात आल्याचेही समोर आले आहे.
 
 
जादूटोणा?
दरम्यान, तपासादरम्यान पोलिसांनी काही संशयास्पद वस्तू जप्त केल्या आहेत. यामध्ये २२ रुद्राक्षांचा डबा, अंक व इंग्रजी अक्षरे असलेली पट्टी, काळ्या रंगाचे भिंग तसेच हिरवट द्रव असलेली बाटली यांचा समावेश आहे. या वस्तूंचा वापर कथित अघोरी कृत्यांसाठी केला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच पीडितेकडून घेतलेल्या कागदपत्रांच्या आधारे आर्थिक व्यवहार करण्यात आले का, याचाही तपास सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा विशेष तपास पथक (एसआयटी) सर्व बाजूंनी तपास करत असून, आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तपासादरम्यान अशोक Ashok Kharat  खरातकडून करण्यात आलेल्या फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील एका कुटुंबाची सुमारे १६ लाखांची जमीन अत्यल्प किमतीत मिळवण्यासाठी खरातने संबंधित कुटुंबावर दबाव टाकल्याचे समोर आले आहे. जमीन शापित असल्याची भीती दाखवत ती विकण्यास भाग पाडले गेले. कुटुंबातील एका तरुणीच्या मृत्यूचा गैरफायदा घेत, जमीन न विकल्यास आणखी अनर्थ होईल अशी धमकी देत ही जमीन पत्नीच्या नावे करून घेतल्याचा आरोप आहे. याच जमिनीवर ईशान्येश्वर महादेव मंदिराची उभारणी करण्यात आल्याची बाबही उघडकीस आली आहे.या प्रकरणात आरोपीची पत्नी कल्पना खरात फरार असून, तिचा शोध घेण्यासाठी एसआयटीने हालचाली वेगवान केल्या आहेत. तिच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली असून, तिच्या नातलगांची चौकशी सुरू आहे. आरोपीचा मुलगा हर्षवर्धन याचीही पुन्हा चौकशी करण्यात आली आहे. दोन दिवस उलटूनही कल्पना खरात पोलिसांच्या हाती लागलेली नसल्याने तपास अधिकच गतीमान करण्यात आला आहे.या प्रकरणामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली असून, अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणूक आणि अत्याचारांच्या घटना पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्वंकष तपास सुरू असून, संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.