६५ वर्षीय वृद्ध महिलेचा अपहरण करण्याचा प्रयत्न

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
- केशोरी येथील घटना, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

अर्जुनी मोरगाव, 
Attempted kidnapping of an elderly woman तालुक्यातील केशोरी येथे ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा दोन अज्ञात इसमांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी २ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनेची माहिती केशोरी पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, केशोरी पोलिसांसह सी-६० पथक व अर्जुनी मोरगाव, नवेगावबांध येथील पोलिस पथकाकडून रात्री उशिरापर्यंत अज्ञात आरोपींचा शोध घेण्यात आला.
 
 
kidnapping
 
Attempted kidnapping of an elderly woman मिळालेल्या माहितीनुसार, सरस्वता दुधराम नेवारे रा. केशोरी वय अंदाजे ६५ वर्ष या हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसाद घेऊन घरी आल्यानंतर रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास त्या घराच्या मागील बाजूस लघुशंकेसाठी गेल्या असता दोन अज्ञात इसमांनी त्यांना जबरदस्तीने उचलून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी त्यांच्या तोंडात साडीचा पदर टाकुन कोंबण्याचाही प्रयत्न केला. मात्र, सरस्वता नेवारे यांनी मोठ्याने आरडाओरड केल्याने घरासमोरील नागरिक तत्काळ धावून आले. त्यामुळे दोन्ही संशयित इसम घटनास्थळावरून पळून गेले. घटनेदरम्यान एक दुचाकीही दिसल्याचे पीडित महिलेने सांगितले आहे. घटनेमुळे घाबरलेल्या वृद्ध महिलेचा रक्तदाब वाढल्याने तात्काळ डॉक्टरांना बोलावून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दरम्यान काही गावकर्‍यांनीही संशयितांना घरामागील शेतशिवारातून पळून जाताना पाहिल्याचे सांगितले. यानंतर गावकर्‍यांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. घटनेची माहिती केशोरी पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस निरीक्षक मंगेश काळे आपल्या पथकासह दाखल झाले. त्यानंतर भरनोली व गोठणगाव सी-६० पथकालाही पाचारण करण्यात आले. अर्जुनी मोरगाव व नवेगावबांध पोलिसही शोधकार्यात सहभागी झाले. देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित महिलेकडून सविस्तर माहिती घेतली. सध्या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. यावेळी विवेक पाटील यांनी गावकर्‍यांशी संवाद साधून गावात कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करण्याचेही नागरिकांना सांगितले.