बच्चू कडूंवर हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
अन्य दोघांचाही गुन्ह्यात समावेश
पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती
अमरावती, 
Bachu Kadoon प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राजकीय वैमनस्यातून आपल्याला अपघातात ठार मारण्याचा कट रचल्याची तक्रार भाजपाचे आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत बंधू अभिजीत तायडे यांनी दिली आहे. या गंभीर तक्रारीनंतर अमरावती ग्रामीण पोलिसांनी बच्चू कडू यांच्यासह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
 
 
Bachu Kadoon
 
अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत बंधू अभिजीत तायडे (वय ४०, रा. कोल्हा काकडा) हे मतदारसंघात जनसंपर्क वाढविण्यासाठी कार्यरत असतात. त्यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार आमदार प्रवीण तायडे यांना राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी बच्चू कडू यांनी त्यांना (अभिजीत तायडे यांना) अपघाताचा बनाव करून संपवण्याचा कट रचला होता. तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे, गेल्या डिसेंबर महिन्यात बच्चू कडू यांच्या कुरळपूर्णा येथील निवासस्थानी एक बैठक झाली होती. या बैठकीत बच्चू कडू, शुभम उर्फ गोलू माहोरे आणि इतर व्यक्ती अभिजीत तायडे यांना अपघातात ठार मारण्याबाबत चर्चा करत होते. एका गोपनीय साक्षीदाराने या संभाषणाचे रेकॉर्डिंग केले असून, त्या संभाषणाची क्लिप असलेला ‘पेन ड्राईव्ह’ तक्रारदाराने पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. आमदार प्रवीण तायडे हे विधिमंडळाच्या अधिवेशनात व्यस्त असल्याने ही तक्रार देण्यास विलंब झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तक्ररीवर आ. तायडे यांची पण स्वाक्षरी आहे.
 
 
Bachu Kadoon प्राप्त तक्रार आणि पेन ड्राईव्हमधील प्राथमिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून बच्चू कडू, शुभम उर्फ गोलू माहोरे आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरूद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ५५, ५८ आणि ६१ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी जप्त केलेली ऑडिओ क्लिप आणि त्यातील संभाषणाची सत्यता पडताळण्यासाठी ती न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहे. या संवेदनशील प्रकरणानंतर परिसरात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडवणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चांदूर बाजार पोलिस करीत आहेत.
 
 
माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न : बच्चू कडू
माझ्यावर हत्येच्या कटाचा आरोप लावून मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा निव्वळ मला बदनाम करण्याचा आणि माझा आवाज दाबण्याचा राजकीय डाव आहे, असा आरोप माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. आज एका व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा दावा करत सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ही कथित घटना डिसेंबरमधील आहे, असे तक्रारकर्ते म्हणतात, मग चार महिन्यानंतर एप्रिलमध्येच गुन्हा कसा दाखल झाला? हत्येच्या कटाचा आरोप लावून मला आत टाकण्याचे नियोजन सुरू आहे. ज्या तत्परतेने पोलिसांनी पहाटेपासून कारवाई सुरू केली, त्यावरून हे सर्व पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होते, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.
 
 
ही मानसिकता योग्य नाही : बावनकुळे
शुक्रवारी अमरावती दौर्‍यावर असलेले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सदर प्रकरणावर म्हणाले, या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली आहे. निवडणुकीत विजय - पराजय होत असतात. पराजयानंतर त्याचा बदला घेण्यासाठी विजयी उमेदवाराला किंवा त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला मारण्याचा कट रचने ही गंभीर बाब आहे. लोकशाही व्यवस्थेत अशी मानसिकता कदापी योग्य नाही. अमरावती ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.