लाखांदूर,
Bear movement on Chaprad hill विदर्भातील प्रसिद्ध आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दुर्गा माता मंदिर परिसरात मागील सहा महिन्यांपासून एका अस्वलाने ठाण मांडले आहे. विशेषतः ३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता हे अस्वल मंदिर परिसरात उजळ माथ्याने वावरताना दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून, अस्वलाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरचप्राड येथील पहाडीवर अस्वलाचा वावर वाढल्याने दररोज दर्शनासाठी येणाऱ्या शेकडो भाविकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या अस्वलाने आता केवळ वावरच नाही, तर धुमाकूळ घालण्यासही सुरुवात केली आहे. मंदिर परिसरातील पूजेच्या साहित्यांच्या दुकानांची या अस्वलाने नासधूस केली असून, खाद्याच्या शोधात ते दुकानांचे नुकसान करत आहे. अस्वलाच्या भीतीमुळे कधीकाळी रात्री उशिरापर्यंत गजबजलेला हा परिसर आता सायंकाळी ६ वाजताच निर्मनुष्य होत आहे.
वनविभागाची 'थातुरमातुर' कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर समितीने दोन महिन्यांपूर्वीच वनविभागाला लेखी निवेदन देऊन अस्वलाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ 'येऊन पाहून जाणे' (दौरा करणे) इतकीच औपचारिकता पार पाडली. प्रत्यक्षात अस्वलाला पकडण्यासाठी किंवा त्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत.
अनुचित घटनेची शक्यता
या पहाडीवर खूप दाट जंगल नसल्याने अस्वल थेट मानवी वावराच्या ठिकाणी, म्हणजेच मंदिर परिसरात सहज पोहोचत आहे. अशा स्थितीत एखादी मोठी दुर्घटना घडण्याची किंवा अस्वलाने भाविकांवर हल्ला करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. "आम्ही वारंवार विनंती करूनही वनविभाग झोपलेले आहे का? एखादा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येईल का?" असा संतापजनक सवाल आता स्थानिक नागरिक आणि भाविक उपस्थित करत आहेत. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन अस्वलाचा बंदोबस्त करावा, अन्यथा भाविकांच्या आंदोलनाचा सामना करावा लागेल, असा इशाराही मंदिर समितीने दिला आहे.