चेन्नई,
BJP announces candidates for Tamil Nadu भारतीय जनता पक्षने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवार मैदानात उतरवण्यास सुरुवात केली असून शुक्रवारी पक्षाने २७ उमेदवारांची यादी जाहीर केली. दक्षिण भारतातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या तामिळनाडूमध्ये निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला वेग दिला आहे. भाजपने जाहीर केलेल्या या यादीत पक्षाच्या अनेक प्रमुख चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

मायलापूर मतदारसंघातून डॉ. तमिळसाई सौंदरराजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर कोईम्बतूर (उत्तर) मधून वनथी श्रीनिवासन यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तसेच अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अवनाशी मतदारसंघातून केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. याशिवाय राज्यातील विविध मतदारसंघांमध्ये भाजपने स्थानिक पातळीवरील नेते आणि कार्यकर्त्यांना उमेदवारी देत निवडणूक लढवण्याची रणनीती आखली आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघमला सर्वाधिक १६७ जागा देण्यात आल्या असून भाजप २७ जागांवर निवडणूक लढवणार आहे. याशिवाय पाट्टाली मक्कल कळघम, अम्मा मक्कल मुनेत्र कळघम आणि इतर लहान पक्षांनाही जागा वाटप करण्यात आले आहे.
दरम्यान, या निवडणुकीत मुख्य लढत द्रविड मुनेत्र कळघम आणि काँग्रेसच्या आघाडीविरुद्ध एआयएडीएमके-भाजप आघाडी अशी पाहायला मिळणार आहे. राज्यातील सर्व २३४ विधानसभा जागांसाठी २३ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील राजकीय वातावरण तापले असून प्रचाराला चांगलाच वेग आला आहे.