काँग्रेस शहर व जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया सुरू

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
काँगेसचे सृजन संघटन अभियान
 
अमरावती, 
Congress's Creation Organization Campaign काँग्रेस पक्षाच्या सृजन संघटन अभियानांतर्गत नवीन शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी पक्षाचे निरीक्षक तालुका, विधानसभा व ब्लॅाक पातळीवरील कार्यकर्त्यांसह सामाजिक संस्था व संघटनांची मते जाणून घेणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेसचे निरीक्षक आफताब अहमद यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
 
 
Congress
 
यावेळी आ. भाई जगताप, खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी आमदार डॉ. सुनील देशमुख, विद्यमान जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत प्रामुख्याने उपस्थित होते. आफताब अहमद पुढे म्हणाले, अ. भा. काँग्रेस समितीच्या सूचनेनुसार देशांत विविध राज्यांमध्ये सृजन संघटनात्म अभियान प्रारंभ करण्यात आले आहे. या अभियानाचा सातवा टप्पा सुरू झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष यांची निवड करण्यात येणार आहे. या निवड प्रक्रियेत शिफारसींना फाटा देण्यात आला असून तळागाळातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात येणार आहेत. दोन्ही पदांसाठी अर्ज प्रसिद्ध करण्यात आला असून जे इच्छूक त्यामध्ये सहभागी होतील त्यांच्या संदर्भातील मते तालुका, विधानसभा व ब्लॅाक पातळीवरील कार्यकर्ते, सामाजिक संस्था, संघटना यांच्याकडून जाणून घेण्यात येणार आहे. दोन्ही पदासाठी इच्छूक हा पक्षाचा निष्ठावंत असण्यासोबतच चळवळीतील असणे व विचारधारेशी बांधील असणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
Congress's Creation Organization Campaign  भाई जगताप म्हणाले, अर्जांवर पक्षाचे निरीक्षक व नेते प्रत्यक्ष मते जाणून घेण्यासाठी तालुका पातळीवर १४ ते १७ एप्रिल या कालावधीत जाणार आहे. त्याचा अहवाल अ. भा. काँग्रेस समितीला सादर करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले, माजी आमदार विरेंद्र जगताप, माजी महापौर मिलींद चिमोटे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा जयश्री वानखडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
पदाधिकारी व कार्यर्त्यांमध्ये बाचाबाची
काँग्रेस पक्ष निरीक्षकांची काँग्रेस भवनातील सभागृहात बैठक सुरू असताना बाहेर काही आजी माजी नगरसेवक व पदाधिकार्‍यांमध्ये शाब्दीक हमरीतुमरी सुरू होती. नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत काही माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आली, हा मुद्दा या वादाच्या केंद्रस्थानी होता. माजी नगरसेवक सलिम बेग यांनी शहराध्यक्ष बबलू शेखावत व विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांच्यासोबत वाद घातला. दरम्यान फिरोज खान यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केल्याने वाद चिघळला. दुसर्‍या घटनेत माजी नगरसेवक शोभा शिंदे व विद्यमान नगरसेविका अर्चना आत्राम यांच्यात शाब्दी चकमक झाली. माजी नगरसेविका शोभा शिंदे व वंदना कंगाले यांनी मनपा निवडणुकीत उमेदवारी कापल्याची नाराजी निरीक्षकांसमोर व्यक्त केली.