रायपूर,
Convicted on Amit Jogi छत्तीसगडच्या माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे पुत्र आणि माजी आमदार अमित जोगी यांना उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. राम अवतार जग्गी हत्या प्रकरणात न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले असून तीन आठवड्यांच्या आत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. ही घटना २००३ साली रायपूर येथे घडली होती, जेव्हा उद्योगपती-राजकारणी राम अवतार जग्गी यांची हत्या झाली होती आणि तेव्हा अजित जोगी राज्याचे मुख्यमंत्री होते.
या प्रकरणात २००७ मध्ये विशेष सीबीआय न्यायालयाने २८ जणांना दोषी ठरवले होते, परंतु अमित जोगी यांना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले गेले होते. त्यानंतर सीबीआयने या निर्णयाविरुद्ध छत्तीसगड उच्च न्यायालयात अपील केली, पण विलंबामुळे ती फेटाळण्यात आली. नंतर सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, ज्याने विलंब माफ करून प्रकरण उच्च न्यायालयाकडे परत पाठवले.उच्च न्यायालयाने २ मार्च २०२६ रोजी सुनावणी करून अमित जोगी यांना दोषी ठरवले. यावरून अमित जोगी यांनी एएनआयशी बोलताना म्हटले की, उच्च न्यायालयाने सीबीआयचे अपील स्वीकारले असले तरी त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली गेली नाही. त्यांच्या मते, कनिष्ठ न्यायालयाने निर्दोष ठरवलेल्या व्यक्तीला त्याची बाजू ऐकून न घेता शिक्षा देणे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांविरोधात आहे.
जोगी यांनी पुढे स्पष्ट केले की, उच्च न्यायालयात सुनावणी केवळ चार दिवसांत पूर्ण झाली, तर प्रकरणातील सीबीआयची अपील सुमारे १२,००० पानांची आहे. अशा अल्प कालावधीत प्रकरणाचा अभ्यास करणे आणि प्रभावी युक्तिवाद करणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे. अतिरिक्त वेळेची विनंती करूनही त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी देण्यात आली नाही, असे ते म्हणाले. अमित जोगी यांनी असेही नमूद केले की, प्रकरण अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि तिथे त्यांना निष्पक्ष न्याय मिळेल, याची त्यांना खात्री आहे.