नवी दिल्ली,
youth-stabbed-to-death : राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्लीतील हैदरपूर कालव्याजवळ झालेल्या भांडणात एका २० वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी केवळ १८ वर्षांचा असून त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून गुन्ह्याची कबुली दिली आहे. वृत्तानुसार, ही घटना गुरुवारी घडल्याचे सांगितले जात आहे.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
वृत्तानुसार, पोलिसांनी शुक्रवारी जाहीर केले की, दिल्लीच्या हैदरपूर कालव्याजवळ झालेल्या तरुणाच्या हत्येतील आरोपीची ओळख १८ वर्षीय करण कुमार उर्फ तरुण अशी पटली आहे. गुरुवारी, आरोपीने त्याचा मित्र मॉन्टी (२२) आणि एका अल्पवयीन मुलासोबत मिळून नितेश नावाच्या तरुणावर हल्ला केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले की, मृत नितेश आणि आरोपी करण यांच्यात वाद झाला, ज्या दरम्यान नितेशवर अनेक वेळा चाकूने वार करण्यात आले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या नितेशला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तेथे मृत घोषित केले. पोलिसांनी शुक्रवारी जाहीर केले की, या हत्येप्रकरणी दोन व्यक्ती आणि एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पुढील तपास आणि कारवाई सुरू असून, हत्येमध्ये वापरलेल्या चाकूचाही शोध घेतला जात आहे.
हत्येनंतर बनवला व्हिडिओ
मिळालेल्या माहितीनुसार, त्या तरुणाच्या हत्येनंतर, मुख्य आरोपी करणने इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट करून गुन्ह्याची कबुली दिली. या व्हिडिओमध्ये आरोपीने, आपण एक 'खून' केल्याचे आणि त्यामुळे काही काळ भूमिगत होणार असल्याचे म्हटले आहे. आरोपीने आपल्या फॉलोअर्सना या काळात आपल्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.